प्रतिनिधी /काणकोण
तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्या सैयोनी घोष यांनी काणकोणच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयाला भेट देऊन काणकोणचे उमेदवार असलेले महादेव देसाई आणि अन्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी नगरसेविका चंपा पागी, अशोक पागी, नवदीप फळदेसाई आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
गोवा हे प्रगत राज्य असून या ठिकाणी करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. परंतु आजवरच्या लोकप्रतिनिधींनी केवळ स्वतःचा स्वार्थ पाहिला. आपला पक्ष या ठिकाणच्या लोकांना बरोबर घेऊनच गोव्याचा विकास साधणार आहे. काणकोणसारख्या भागात कनेक्टिव्हिटीची समस्या असून या ठिकाणी कनेक्टिव्हिटी आणण्यासाठी सरकारची विशेष गरज नाही. फक्त काम करण्याची तयारी असायला हवी, असे मत घोष यांनी यावेळी बोलताना व्यकत केले. गोव्यातील पक्षाच्या सर्व उमेदवारांना शक्य तेवढे सहकार्य करण्यासाठी तृणमूलचे सर्व नेते सज्ज झालेले असून गोव्यात आपला पक्ष सत्ता मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महादेव देसाई यांचेही भाषण झाले.