प्रतिनिधी/ कुरुंदवाड
भाजपचे प्रवक्ते व माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने शिवसैनिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कुरुंदवाड येथे शिवसेनेच्यावतीने आज, मंगळवारी (दि.4) सकाळच्या सुमारास जोडे मारून शेलार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
कुरुंदवाड व शिरोळ तालुका शिवसेनेच्यावतीने कुरुंदवाड येथील भालचंद्र थिएटर चौकामध्ये शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्रित झाले. यावेळी शिवसैनिकांनी शेलार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून पुतळ्याचे दहन करत निषेधाच्या घोषणा दिल्या. या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त करत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून भाजपवाल्यांनी बदनामीकारक वक्तव्य थांबवावीत अन्यथा शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तरे दिली जातील असा इशारा दिला.
यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा शिवसेना उपप्रमुख मधुकर पाटील, कुरुंदवाड शहर प्रमुख राजू आवळे, माजी नगराध्यक्ष वैभव उगळे, शिवसेना वाहतुक सेना तालुका अध्यक्ष सुनील जुगळे, मार्केट कमिटी सभापती आप्पासो भोसले, रामभाऊ माळी, संतोष नरके, बाबासो सावगावे, जम्बो जमादार, निलेश तवंदकर, कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष मंगला चव्हाण, शहराध्यक्ष वैशाली जुगळे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.