ऑनलाईन टीम / बँकॉक :
थायलंडच्या चुलालोंगकॉन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी तंबाखूच्या पानांपासून कोरोनावरील लस शोधल्याचा दावा केला आहे. कोरोना विषाणूचे तंबाखूच्या पानांसोबत एकत्रिकरण करून ही लस तयार केली जाते. या लसीची माकडावर करण्यात आलेली पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. थाई रेडक्रॉस संसर्गजन्य रोग आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. तिरावत हेमाचुडा यांनी यासंदर्भात माहिती दिली.
हेमाचुडा म्हणाले, कोरोना विषाणूच्या डीएनएला तंबाखूच्या पानांसोबत एकत्रित केल्यास त्या पानांत एका आठवड्यात प्रथिने तयार होतात. त्या प्रथिनांचा अर्क काढून लस तयार करण्यासाठी वापरण्यात येतो. त्यामुळे ही लस तयार करणे सोपे आणि स्वस्त आहे. सुरुवातीला माकड आणि उंदरावर या लसीची चाचणी घेण्यात आली. आता ही चाचणी माणसावर करण्यात येणार आहे.
जगभरात 100 हून अधिक कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे. रशिया, चीन, ब्रिटन, अमेरिकेत कोरोना लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे.