दापोलीत 13 जागांसाठी 43, मंडणगडातही 13 जागांसाठी 35 उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद
प्रतिनिधी/ दापोली, मंडणगड
दापोली नगर पंचायतीच्या मंगळवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानात दापोलीकरांनी दाखवलेल्या उत्साहामुळे मतदारांचा नेमका कल समजून येत नसल्याने येथील सर्वच राजकीय पक्षांची चिंता वाढली आहे. नगर पंचायतीच्या मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत तब्बल 65 टक्के मतदारांनी आपला निवडणुकीचा हक्क बजावल्याने 43 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले आहे. अपक्षांच्या आव्हानामुळे रंगतदार ठरलेल्या मंडणगड नगर पंचायतीच्या 13 जागांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीही मंगळवारी सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत एकूण 83.12 टक्के मतदान झाले. येथे 35 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले आहे.
दापोली नगर पंचायतीच्या 16 जागांपैकी 4 जागा ओबीसी आरक्षणाच्या वगळता 13 जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. दापोलीत 4561 पुरुष तर 4429 असे एकूण 8990 मतदार आहेत. सकाळपासून मतदारांचा मतदान केंद्रावर उत्साह दिसून येत होता. कडाक्याच्या थंडीचा परिणाम सकाळच्या मतदानावर जाणवला. पहिल्या दोन तासात 13 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दीड वाजेपर्यंत दापोलीत 45 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. हा आकडा पुढे वाढत जाऊन सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत 65 टक्के मतदारांनी मतदान हक्क बजावल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रभाग 3 मधील मशीन बंद
दापोलीत प्रभाग 3मधील मशीन तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱयांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी या बाबत प्रशासनाशी संपर्क साधला. यानंतर हे मशीन बदलून देण्यात आले.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी नगर पंचायतीच्या अखत्यारित 70 कर्मचारी कार्यरत होते. तसेच पोलीस स्थानकाच्यावतीने एपीआय दर्जाचे दोन, पीएसआय दर्जाचे चार अधिकारी, पोलीस नाईक 89, गृहरक्षक दलाचे 25 जवान, आरसीपीचे 1 प्लाटून व एसआरपीएफचे 1 प्लाटून बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. या सर्वांच्या व्यवस्थेसाठी पोलिसांच्यावतीने 6 वाहनेही तैनात करण्यात आली होती.
दळवी, कदमांची बुथवर भेटी, योगेश कदमांचाही फेरफटका
माजी आमदार शिवसेना नेते सूर्यकांत दळवी व राष्ट्रवादीचे नेते संजय कदम हे गाडीतून एकत्र आघाडीच्या बुथवरील कार्यकर्त्यांना भेटी देत होते तर शिवसेनेचे आमदार योगेश कदम हे देखील आपल्या समर्थकांसह फिरताना दिसत होते. तसेच भाजपाचे पदाधिकारी उदय नगर, वडाचा कोंड व अन्य ठिकाणी फिरून मतदारांचा उत्साह वाढवताना दिसून येत होते.
नगर पंचायत निवडणुकीत यावर्षी अचानक पोलिसांनी काही प्रभागातील मतदान केंद्राबाहेरील रस्त्यांवरील वाहतूक बंद केल्याने वाहतूकदारांची गैरसोय झाली. मात्र काही जागरूक नागरिकांनी आक्षेप नोंदवल्यानंतर हे रस्ते वाहनांसाठी मोकळे करण्यात आले. गाडीतळ येथील महत्वाच्या मतदान केंद्रासमोरील रस्ताही वाहतुकीसाठी सकाळपासून बंद होता. यामुळे दापोलीकरांची मोठी अडचण होत होती. मात्र शहरातील काही व्यापारी व पत्रकारांनी पोलिसांना विनंती केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला. सकाळपासून सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करताना दिसत होते. गाडीतळ परिसरामध्ये तेथील काही उमेदवार मतदारांना घेऊन मतदान कक्षापर्यंत जात असल्याने यावर काही उमेदवारांनी आक्षेप घेतला. यानंतर हा प्रकार थांबला. तसेच गाडीतळ परिसरात असणाऱया एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानातून वोटर्स स्लिप वाटण्यात येत होत्या. यालाही राजकीय कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यावर हा प्रकार देखील बंद झाला.
मंडणगडात 200 जणांचा ताफा
मंडणगड नगर पंचायतीच्या 13 जागांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 35 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले आहे. मंगळवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 76.08 टक्के मतदान झाले. तर सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत एकूण 83.12 टक्के मतदान झाले.
सकाळी 7.30 वाजता मतदान प्रक्रियेस शांततेत सुरुवात झाली. मतदानाचा जोर पहिल्या सत्रात वाढला होता. दुपारी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 76.08 टक्के इतके मतदान झाले. या वेळेत प्रभाग क्रमाक 14मध्ये सर्वाधिक म्हणजे 92.31 टक्के इतके मतदान झाले. सर्वात कमी मतदान प्रभाग क्रमांक 16 मध्ये 66.03 टक्के झाले. मतदान केंद्रे व परिसरास पोलीस छावणीचे रुप आले होते. बंदोबस्तासाठी 1 पोलीस निरीक्षक, 5 पोलीस उपनिरीक्षक, 54 पोलीस कर्मचारी व 40 गृहरक्षक दलाचे जवान, एस.आर.पी.चे 100 जवान असा 200जणांचा ताफा तैनात करण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी खेड भाग्यश्री मोरे, तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या मार्गदर्शनखाली महसूल विभागाचे व विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवला.
चुरशीच्या लढतीमुळे पोलीस दलाने घेतली विशेष काळजी
महाविकास आघाडीमुळे सुरुवातीला निरस वाटणारी निवडणूक अपक्षांच्या आव्हानामुळे उत्तरोत्तर रंगतदार झाली. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवारांनी आधीपासून निवडणुकांची तयारी केल्याने प्रचाराची रंगत वाढली. यामुळे पोलिसांनी विशेष काळजी घेतल्याचे दिसले. काही प्रभागातून पैशाच्या वाटपाच्या तक्रारी पुढे आल्याने निवडणूक शाखा व पोलीस दक्ष होते.