ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील भाजप मुख्यालयात 42 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी भाजपच्या कोअर ग्रुपच्या बैठकीपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये 42 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बहुतांश जण स्वच्छता कर्मचारी आहेत. या सर्वांना सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भाजपने एक नवीन प्रोटोकॉल सुरू केला आहे. कोणत्याही मोठय़ा बैठकीपूर्वी त्यांच्या मुख्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेतली जाईल. त्यानुसार सोमवारी सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी भाजपच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबतच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाच्या या मुख्यालयात पार पडली होती. त्यानंतर बैठकीची दुसरी फेरी आज होणार आहे. त्यापूर्वी 42 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.