भाजप आमदार-आप यांच्यात शब्दद्वंद्व, कामकाज स्थगित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नवनिर्वाचित दिल्ली विधानसभेच्या प्रथम बैठकीत प्रचंड गोंधळ झाला आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्या सदस्यांमध्ये जोरदार शब्दयुद्ध झाल्याने कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. भाजपच्या आमदारांनी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचा आणि त्यासंर्भातील राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्स घेऊन प्रवेश केला.
भाजप आमदारांनी सत्ताधारी पक्षाचा जोरदार निषेध केला. दिल्लीतील सर्वसामान्य नागरीकांचे जीवन प्रदूषणाने ग्रासलेले असताना दिल्ली सरकार मात्र स्वतःच्या गुणगानाच्या जाहिराती देण्यात मग्न आहे. प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी या सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना श्वास घेण्यासाठीही शुद्ध हवा उरलेली नाही. सरकारने त्वरित प्रदूशणाच्या मुद्दय़ावर बैठक बोलावून तोडगा काढवा अशी मागणी त्यांनी केली.
भाजपच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी आम आदमी पक्षाच्या सदस्यांनीही जोरदार घोषणाबाची केली. दिल्लीच्या परिस्थितीसाठी दिल्ली सरकार नव्हे तर दिल्लीचे उपराज्यपाल उत्तरदायी आहेत. त्यांनी पक्षपाती वर्तणूक सोडली पाहिजे असा आरोप आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी केला.