प्रतिनिधी / पणजी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सोमवारी आल्तिनो-पणजी येथे सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली. ती केवळ सदिच्छा भेट होती, असे नंतर त्या दोघांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग या गोव्याशेजारील जिल्हय़ात पडवे – मालवण येथे कोविड लॅबच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी फडणवीस मुंबईहून विमानमार्गे दाबोळीत आले. नंतर दाबोळीतून मालवण येथे गेले होते. तेथून परत दाबोळीला जात असताना त्यांनी सावंत यांच्या आल्तिनो-पणजी येथील बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रात कोरोनाचे संकट गंभीर असून तेथे कोरोना चाचणीचा वेग तसेच आयसोलेशन सुविधा वाढविण्याची गरज आहे. आम्ही सरकारला वेळोवेळी सूचना करीत आहोत. देशातील मृत्यू दराचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही सहकार्य देत आहोत. ऍण्टीजॅन चाचणीदेखील होणे आवश्यक आहे. तथापि त्याचे व रुग्णांचे प्रमाण समान असायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
गोव्यात कोविड व्यवस्थापनासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जात असून फोंडा उपजिल्हा इस्पितळ आता कोविड हॉस्पिटल करण्यात येत आहे. रुग्णांना तेथे स्थलांतरित करण्याचे काम सुरू झाले असून फर्मागुढी येथे कोविड सेंटरही चालू होणार आहे. त्या सेंटरमध्ये व फोंडा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सर्व सुविधा देण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.