वार्ताहर / दोडामार्ग:
सिंधुदुर्ग जिह्यातील अनेक ग्रामपंचायती, नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये तेथील लोकनियुक्त प्रतिनिधी व प्रशासन या दोहोंकडून सध्याच्या कोरोना कालावधीत आपल्या शहराचा कारभार हाकला जात आहे. कोरोनाशी निगडित काळजी, जनजागृती, उपचार यांच्यासोबत शहरातील विकासकामे सुरू राहण्याकडेही या दोहोंचा कल आहे. मात्र, दोडामार्ग शहराचा कारभार हा केवळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱयांकडून हाकला जातो आहे.
19 मार्च 2015 रोजी अस्तित्वात आलेल्या कसई – दोडामार्ग नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक त्याच वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये झाली. 17 नगरसेवकांनी पदभार स्वीकारला. या नगरसेवक-पदाधिकाऱयांची पाच वर्षांची मुदत गेल्या वर्षी 24 नोव्हेंबरला संपली. तेव्हापासून प्रांताधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली या नगरपंचयातीचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली. तेव्हापासून ते आजतागायत गायकवाड दोडामार्ग शहराचा कारभार पाहत आहेत. शहरासाठी आवश्यक असलेली अनेक विकासकामे मार्गी लावण्यासोबत सध्याच्या कोरोना काळात ठिकठिकाणी फवारणी करणे, शहरातील आयटीआयमधील कोव्हिड केअर सेंटरसाठी पाण्याची व्यवस्था करणे, कोरोना तसेच स्वच्छतेला अनुसरून सतत जनजागृती करणे सध्याच्या लॉकडाऊन काळात बाजारपेठेत अनावश्यक गर्दी न होण्याचे नियोजन करणे, आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार कंटेनमेंट झोन घोषित करणे व संबधित कोरोना बधितांना उपाचारासाठी सहकार्य करणे आदी कामे गायकवाड करत आहेत. नगरपंचायतमधील दहा सफाई कामगारांसोबत इतर बारा कर्मचाऱयांसह संपूर्ण शहराचा कारभार एकटे गायकवाड हाकत आहेत. शहरात सुरळीत पाणी पुरवठा राहण्यासोबत अन्य विकासकामे तसेच नागरी सुविधांमध्ये कोणताही खंड पडू नये, याकडे गायकवाड यांनी आपल्या टीमसोबत लक्ष केंद्रित केले आहे. दोडामार्ग शहरात सोमवारपर्यंत कोरोनाचे सक्रिय 41 रुग्ण असून त्यांना योग्य उपचार मिळण्याकडे गायकवाड व प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे.