जोहान्सबर्गमधील दुसऱया कसोटीत 240 धावांचा पाठलाग करताना द. आफ्रिका 2 बाद 118
जोहान्सबर्ग / वृत्तसंस्था
कर्णधार डीन एल्गारच्या (121 चेंडूत नाबाद 46) जिगरबाज खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकन संघ भारताविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्यात विजयाच्या दिशेने आगेकूच करण्यात बऱयाच अंशी यशस्वी ठरला आहे. विजयासाठी 240 धावांचे आव्हान असताना एल्गारच्या खेळीमुळे आफ्रिकन संघाने 2 बाद 118 अशी मजबूत स्थिती गाठली असून या लढतीत दोन दिवसांचा खेळ बाकी असताना त्यांना विजयासाठी आणखी 122 धावांची आवश्यकता आहे. भारताला मात्र केवळ चमत्कारावरच अवलंबून रहावे लागेल, असे स्पष्ट चित्र आहे.
विजयासाठी 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकन सलामीवीरांनी 47 धावांची सलामी दिली. एडन मॅरक्रम (31) व कर्णधार डीन एल्गार यांचा सावध पवित्र्यावर अधिक भर राहिला. जोरदार फटकेबाजी करण्याऐवजी स्ट्राईक रोटेट करण्यावर आणि खराब चेंडूंची प्रतीक्षा करण्यावर भर देण्याची त्यांची रणनीती विशेष फलद्रूप ठरली. दिवसअखेर एल्गार व डय़ुसेन (नाबाद 11) नाबाद राहिले.
तत्पूर्वी, दिवसातील दुसऱया सत्रात भारताने उपाहारानंतर आणखी 78 धावा जोडल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचे आव्हान ठेवले. हनुमा विहारी 40 धावांवर नाबाद राहिला तर शार्दुल ठाकुरने 24 चेंडूत 28 धावांची खेळी साकारली. दक्षिण आफ्रिकेतर्फे रबाडा (20 षटकात 3-77), एन्गिडी (10.1 षटकात 3-43) व मार्को जान्सन (17 षटकात 3-67) या त्रिकुटाने प्रत्येकी 3 बळी घेतले आणि भारताचा दुसरा डाव 266 धावांवर संपुष्टात आणला.
पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने 4 बळी घेत उत्तम सुरुवात नोंदवली. तिसऱया दिवसाच्या खेळाला प्रारंभ केल्यानंतर पुजारा (86 चेंडूत 53) व रहाणे (78 चेंडूत 58) यांनी आणखी 70 धावांची भर घातली. अखेर रबाडाने ही जोडी फोडली. त्याने रहाणेला 58 धावांवर यष्टीमागे झेल देणे भाग पाडले तर पुजाराला पायचीत केले. रहाणेच्या अर्धशतकी खेळीत त्याने मार्को जान्सनच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर पॉईंटच्या दिशेने खेचलेला षटकार लक्षवेधी ठरला. पुजारा व रहाणे या जोडीने एकत्रित 18 चौकार व 1 षटकार फटकावले.
रबाडाने नंतर रिषभ पंतला देखील बाद केले आणि बुधवारच्या खेळात भारताने तिसरा गडी गमावला. रिषभ पंतचे खराब फटक्यावर बाद होणे खूपच निराशाजनक ठरले. अगदी ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांनी पंतच्या खराब फटक्यावर कडाडून टीका केली.
चेतेश्वर पुजारा व रहाणे यांनी शानदार अर्धशतके झळकावत डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असला तरी रबाडाने या दोन्ही फलंदाजांना बाद करत द. आप्रेकेला सामन्यात विजयाच्या ट्रकवर आणले.
धावफलक
भारत पहिला डाव ः सर्वबाद 202
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः सर्वबाद 229
भारत दुसरा डाव ः केएल राहुल झे. मॅरक्रम, गो. जान्सन 8 (21 चेंडूत 1 चौकार), मयांक अगरवाल पायचीत गो. ऑलिव्हिएर 23 (37 चेंडूत 5 चौकार), चेतेश्वर पुजारा पायचीत गो. रबाडा 53 (86 चेंडूत 10 चौकार), अजिंक्य रहाणे झे. व्हेरेन, गो. रबाडा 58 (78 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), हनुमा विहारी नाबाद 40 (84 चेंडूत 6 चौकार), रिषभ पंत झे. व्हेरेन, गो. रबाडा 0 (3 चेंडू), रविचंद्रन अश्विन झे. व्हेरेन, गो. एन्गिडी 16 (14 चेंडूत 2 चौकार), शार्दुल ठाकुर झे. महाराज, गो. जान्सन 28 (24 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), शमी झे. व्हेरेन, गो. जान्सन 0 (6 चेंडू), जसप्रित बुमराह झे. जान्सन, गो. एन्गिडी 7 (14 चेंडूत 1 षटकार), सिराज त्रि. गो. एन्गिडी 0 (2 चेंडू). अवांतर 33. एकूण 60.1 षटकात सर्वबाद 266.
गडी बाद होण्याचा क्रम
1-24 (केएल राहुल, 6.5), 2-44 (मयांक, 11.4), 3-155 (रहाणे, 34.6), 4-163 (पुजारा, 36.6), 5-167 (पंत, 38.3), 6-184 (अश्विन, 43.3), 7-225 (शार्दुल, 49.6), 8-228 (शमी, 51.5), 9-245 (बुमराह, 56.2), 10-266 (सिराज, 60.1).
गोलंदाजी
रबाडा 20-3-77-3, ऑलिव्हिएर 12-1-51-1, एन्गिडी 10.1-2-43-3, जान्सन 17-4-67-3, केशव महाराज 1-0-8-0.
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव ः डीन एल्गार खेळत आहे 46 (112 चेंडूत 2 चौकार), एडन मॅरक्रम पायचीत गो. शार्दुल 31 (38 चेंडूत 6 चौकार), किगन पीटरसन पायचीत गो. अश्विन 28 (44 चेंडूत 4 चौकार), रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन खेळत आहे 11 (37 चेंडू). अवांतर 2. एकूण 40 षटकात 2 बाद 118.
गडी बाद होण्याचा क्रम
1-47 (एडन मॅरक्रम, 9.6), 2-93 (किगन, 27.2).
गोलंदाजी
बुमराह 10-1-42-0, शमी 9-2-22-0, शार्दुल 9-1-24-1, सिराज 4-0-14-0, अश्विन 8-1-14-1.
अखेर रबाडाची ‘ती’ रणनीती चांगलीच फलद्रूप ठरली!
भारतीय संघ 2 बाद 155 धावांसह एकवेळ 128 धावांच्या भक्कम आघाडीवर उत्तम स्थितीत होता. यावेळी दक्षिण आफ्रिकन गोलंदाज बाऊन्सवर व फुल्ल लेंग्थ गोलंदाजीवर अधिक भर देतील, असाच एकंदरीत होरा होता. पण, डेल स्टेनचा वारसदार म्हणून ओळखल्या जाणाऱया अनुभवी रबाडाने प्रत्यक्षात बॅक ऑफ लेंग्थवर एका क्रॅकवर सातत्याने मारा करण्याची रणनीती राबवली आणि रहाणे या चक्रव्युहात अलगद सापडला. रहाणेचा एक फटका चुकल्यानंतर यष्टीरक्षक व्हेरेनने सोपा झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. रबाडाने याच रणनीतीने पुजाराला देखील पायचीत केले.
मैदानी पंच अलाहुद्दीन पालेकर आणि त्यांचे रत्नागिरी-खेड कनेक्शन!
जोहान्सबर्ग येथे सुरु असलेल्या या कसोटी सामन्याच्या माध्यमातून कसोटी पंच म्हणून पदार्पण करत असणारे अलाहुद्दीन पालेकर यांचे कुटुंबिय मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
रत्नागिरी जिल्हय़ात खेड तहसीलमधील शिव हे पालेकर यांचे मूळ गाव. शिव खेडय़ाचे सरपंच दुर्वेश पालेकर बुधवारी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, ‘मी ही पालेकर आहे. अलाहुद्दीन यांचे कुटुंबिय याच खेडय़ातील आहेत. त्यांच्या वडिलांनी नोकरीसाठी दक्षिण आफ्रिकेला वास्तव्य हलवले आणि नंतर ते तिथेच स्थिरस्थावर झाले. अलाहुद्दीन यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला असला तरी त्यांचे गाव मात्र खेड तहसीलमधील आहे. शिव खेडय़ाला, ग्रामपंचायतीला त्यांचा अभिमान आहे’.
स्वतः प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेल्या 44 वर्षीय अलाहुद्दीन पालेकर यांनी 2014-15 भारतीय प्रथमश्रेणी हंगामात मुंबई-मध्य प्रदेश यांच्यातील अनिर्णीत सामन्यात पंच म्हणून काम पाहिले होते. त्या लढतीत सुर्यकुमार यादव (135) व श्रेयस अय्यर (नाबाद 142) यांनी शानदार शतके झळकावली होती.