ऑनलाईन टीम / नेवासा :
अहमदनगर-औरंगाबाद महामार्गवर स्विफ्ट आणि लक्झरी गाडीची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड फाटा येथे पहाटे 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा जवळ हा अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि स्विफ्ट गाडीची धडक इतकी जोरदार होती की स्विफ्ट कारचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेले प्रवासी जालना जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स अहमदनगरहून औरंगाबादकडे जात होती तर स्विफ्ट कार औरंगाबादहून अहमदनगरच्या दिशेने जात होती. देवगड फाट्याजवळ दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले आहे. अपघातात स्वीप्ट कार ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूस घुसल्याने स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केले व जखमींना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे दाखल केले. परंतु सर्व पाचही जण उपचारापूर्वीच मयत झाले आहेत. पुढील कार्यवाही नेवासा पोलीस करत आहे.