ईरण्णा गंचिनगोटे / कुंभारी
सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच दाखल झालेल्या तुर्कस्तानच्या कांद्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या गेल्या. पहिल्याच पसंतीस पडलेला हा कांदा 100 रुपये नगाप्रमाणे विकला असून, एका नगाचे वजन 600 ते 700 ग्रॅम भरले.
बाजार समितीतील गजानन होनराव यांच्या कांद्याच्या दुकानात एक क्विंटल कांदा तालीकोटी (जि. विजयपूर) येथील व्यापारी संगप्पा मळगोंड यांनी प्रायोगिक तत्त्वावर बेंगळुरच्या बाजार समितीतून विक्रीसाठी सोलापुरला आणला होता. यातून बाजाराचा कल त्यांना आजमावयचा होता. पहिल्यांदाच बाजारात हा कांदा आल्याने घेणारे व पाहणाऱयांना फारच कौतुक वाटले. पाहता पाहता नगाप्रमाणे एक क्विंटल कांदा विकला गेला. दिसायला पिवळसर, दुरुन डाळिंबासारखा वाटणारा कांदा हातात मावेल इतका मोठा आहे. यात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने वजनही जास्त भरते. एका नगाचे वजन अर्धा किलोपेक्षा जास्त असल्याने साधारपणे एका किलोमध्ये दोन कांदे मावतील. यामुळे 200 रुपयांपेक्षा अधिक किंमत एका किलोला मोजावे लागणार आहे.
यंदा सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चांकी दर मिळाला. या दराने जगाचे लक्ष वेधून घेत असल्याचे बाहेरुन येणाऱया कांद्यामुळे सिद्ध होत आहे. सध्या वाढलेल्या कांद्याच्या दराने हॉटेल, स्वयंपाक घरातून कांदा गायब झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान, अफगणिस्तानानंतर तुर्कस्तानच्या कांद्याने सोलापुरात एंट्री केली आहे. हा प्रयोग बाजार व ग्राहकांचा कल आजमविण्याबरोबरच भावाचा अंदाज घेणारा ठरला असला तरीही भविष्यात या कांद्याला सोलापूर बाजार खुणवेल, याचीच दाट शक्यता आहे.
चवीला खारट
दिसायला मोठा, पिवळसर असल्याने डोळ्यांना आकर्षित करणारा आणि वजनाने जास्त असल्याने या कांद्याकडे बघ्यांच्या नजरा वळतात. पण डोळे दिपून टाकणारा हा कांदा चवीला मात्र खारट आहे. त्याचा हा खारटपणा भारतीय उग्रवासाच्या कांद्याची सवय असणाऱया सोलापूरकरांना तो आवडेल का, हा महत्त्वाचा विषय आहे.
पहिल्यांदाच ग्राहकांची प्रचंड पसंती
सोलापुरात सर्व प्रथम माझ्याच आडत दुकानात या कांद्याची आवक झाली होती. याच्याविषयी अनेक बाजारपेठा व नेटवर माहिती घेतली होती. मात्र प्रत्यक्षात मला लिलाव करण्याचा योग आला. यामुळे मी फार आनंदीत झालो आहे. पहिल्यांदाच ग्राहकांनीही त्याला पूर्ण पसंदी दिली. पाहता पाहता एक क्विंटल कांदा विकला गेला.
-गजानन होनराव, कांदा व्यापारी, बाजार समिती, सोलापूर