वार्ताहर / गोकुळ शिरगाव
महात्मा बसवेश्वर क्रेडीट सौहार्द सहकारी नि. निपाणी व सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी मठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक ०३ जानेवारी २०२१ रोजी श्री महात्मा बसवेश्वर क्रेडीट सौहार्द सहकारी नि. सभागृह, चिकोडी रोड, निपाणी बस स्थानकाजवळ मोफत ह्रदयरोग चिकित्सा व गुडघेदुखी चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज काल धावपळीच्या जीवनामुळे ह्रदयरोग रुग्णांची संख्या वाढत आहे. या शिवाय जेष्ठ नागरिकांच्यात गुडघेदुखीच्या समस्या अधिक आढळतात. त्यावर सर्वसामान्य रुग्णांवर सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात. निपाणी व परिसरातील अशा रुग्णांवर प्रदीर्घ अनुभव असणारे जेष्ठ हृदयरोग तज्ञ व अस्थीरोग तज्ञ यांच्या मार्फत मोफत तपासणी या शिबिरात करण्यात येणार असून, यात ईसीजी, शुगर आदि तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. ज्या रुग्णांना अँजिओप्लास्टीची आवश्यकता असेल तर अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी ही मोफत करण्यात येणार आहे. या शिवाय बायपास शस्त्रक्रिया व गुडघेदुखी शस्त्रक्रिया ही मोफत करण्यात येणार आहे.
अँजिओग्राफीसाठी सुसज्ज कॅथलॅब, बायपास सर्जरीसाठी भव्य ऑपरेशन थीएटर, ह्रदय तपासणीसाठी २डी इको तसेच इपी स्टडी, एफ एफ आर या अशा अनेक तंत्रज्ञानासह ह्रदयरोग रुग्णांवर कर्नाटक शासनाच्या आयुष्यमान भारत आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार आहेत. तर गुडघेदुखी रुग्णांसाठी दुर्बिणीद्वारे तपासणी व शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.
तरी या शिबिरासाठी निपाणी व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.चंद्रकांत कुरबेट्टी, श्री. सुरेश शेट्टी, डॉ.एस.आर. पाटील, संचालक मंडळ व सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.