कायदेशीर बाबींचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक चौकशीत उघड, गुन्हे दाखल होण्याची शक्यता
8 सावकारांनी दिले नोटिसांना उत्तर
प्रतिनिधी / चिपळूण
रत्नागिरी वरिष्ठ दुय्यम निबंधक कार्यालयाने काही सावकारांच्या कार्यालयांवर टाकलेल्या धाडी, काहींची सुरु असलेली चौकशी यात व्यवहार करताना कायदेशीर बाबींचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या कार्यालयाच्यावतीने अशा सावकारांविरोधात पोलीस स्थानकात तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच येथील 8 सावकारांनी आतापर्यंत नोटीसांना उत्तरे दिली आहेत.
गरिबांची पिळवणूक करुन बक्कळ पैसा मिळत असल्याने गेल्या अनेक वर्षापासून येथे अधिकृत व अनधिकृत अशी दोन्ही प्रकारची सावकारी फोफावली आहे. तालुक्यात 19 जणांनी परवाने घेतले असले तरी प्रत्यक्षात 36 हून अधिक जण येथे बेकायदेशीरपणे हा व्यवसाय करीत आहेत. मात्र सध्या काही सावकारांना भरमसाठ व्याजदर व वसुलीची चुकीची पद्धत आणली असल्याने त्यांच्याविरोधात कर्जदारांमध्ये चीड निर्माण झाली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी शहरातील वडनाका येथील अभिजित गुरव या तरुणाने काही सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. तसा उल्लेख त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठÎांमध्ये केला आहे. त्यामुळे काही तरुणांनी एकत्र येत या विरोधात आवाज उठवला आहे.
यातूनच एका महिलेच्या तक्रारीवरून चांगदेव खंडजोडे, शिवाजी खंडजोडे, पूजा मिरगल या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याचा पोलीस तपास सुरु असतानाच काही दिवसांपूर्वी खंडजोडे या 2 सावकारांच्या राहत्या सदनिकांसह शहरातील कार्यालयावर रत्नागिरी वरिष्ठ दुय्यम निबंधक व चिपळूण कार्यालयातील अधिकाऱयांनी धाडी टाकल्या. यात त्यांच्याकडील कोरे बॉन्डपेपर, धनादेश, वाहनांच्या चाव्या आदी साहित्य जप्त केले आहे. तसेच काही सावकारांची चौकशीही सुरु आहे. यात अनेकांनी व्यवहार करताना कायदेशीर बाबींचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येथील कार्यालयाने याचा अहवाल रत्नागिरी कार्यालयाला पाठवला आहे.
तेथे त्याची पडताळणी करुन त्यानंतर खरोखरच कायदेशीर बाबींचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले तर हे कार्यालय चिपळूण कार्यालयाला अशा सावकारांविरोधात तक्रार देण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गुन्हा दाखल होऊन चुकीचे व्यवहार करणारे सावकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसेच काही दिवसांपूर्वी येथील कार्यालयाने अधिकृत असलेल्या 19 सावकारांना नोटीस धाडून त्यांच्याकडून सध्या सुरू असलेल्या तक्रारींचा खुलासा मागवला होता. त्यानुसार आतापर्यंत 8 जणांनी या नोटीसांना उत्तरे दिली आहेत.