नवी दिल्ली / वृत्तसंस्था
निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली आणखी एक याचिका फेटाळण्यात आली आहे. आपल्याला कायदेशीर साहाय्य देण्यात यावे अशी मागणी या याचिकेत मुकेश सिंग याच्याकडून करण्यात आली होती. आपल्या वकिलाने आपली दिशाभूल केली. त्यामुळे आपले सर्व कायदेशीर अधिकार पुन्हा आपल्याला देण्यात यावेत, अशी मागणीही त्याने केली. तथापि, ही याचिका स्वीकारार्ह नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. सर्व गुन्हेगारांना येत्या 20 मार्चला फासावर लटकविण्याचा आदेश यापूर्वीच देण्यात आला आहे.
चार गुन्हेगारांपैकी तिघांनी त्यांचे मरण टाळण्यासाठी आता नवा मार्ग शोधला असून थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. तथापि, हा मार्ग उपयोगी पडणार नाही, असे तज्ञांचे मत आहे. कारण आंतरराष्ट्रीय न्यायालयाला कोणत्याही देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करता येत नाही, असा नियम असल्याचे अनेक कायदा अभ्यासकांनी स्पष्ट केले. मुकेश सिंग, पवन गुप्ता आणि विनय शर्मा अशी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहचलेल्यांची नावे आहेत.
पालकांची दयामृत्यूसाठी विनवणी
या प्रकरणातील सर्व चार गुन्हेगारांच्या मातापित्यांनी राष्ट्रपतींकडे संयुक्त विनवणीपत्र सादर केले आहे. आम्हाला हे दडपण सहन होत नाही. त्यामुळे प्राणत्याग करण्याची अनुमती द्यावी, अशी विनंती या पत्रात आहे. एका गुन्हेगाराच्या मातापित्यांनी रामायणातील श्लोकाचा आधार घेऊन गुन्हेगारांना दया दाखवावी, अशी विनंतीही केली आहे. ज्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होतो, त्याच्या सर्व अपराधांना मी क्षमा करतो, असे प्रभू रामचंद्र म्हणतात, अशा अर्थाचा हा श्लोक आहे. या प्रकरणाच्या आघाताने आपल्या पतीचा मृत्यू 2017 मध्ये झाला. आता मुकेश हाच माझा आधार आहे. तो काढून घेऊ नका, अशी विनंती मुकेश या गुन्हेगाराच्या मातेने केली आहे. तर अक्षय या गुन्हेगाराला 8 वर्षांचा मुलगा असून तो मोठा झाल्यानंतर त्याला समाज सुखाने जगू देणार नाही. त्यामुळे आम्हाला प्राणत्याग करण्याची अनुमती द्यावी, असे आर्जव त्याच्या मातापित्यांनी केले आहे.