वृत्तसंस्था/ क्वीन्सटाऊन
लॉरेन डाऊन आणि केटी मार्टिन यांच्या 76 धावांच्या भागीदारीच्या जोरावर शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱया वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाने भारताचा 3 गडय़ांनी पराभव करत पाच सामन्यांच्या या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी मिळविली. या मालिकेतील चौथा सामना येत्या मंगळवारी खेळविला जाणार आहे.
या तिसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव 279 धावांत आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने 49.1 षटकात 7 बाद 280 धावा जमवित सामना आणि मालिका जिंकली.
भारताच्या डावामध्ये दीप्ती शर्माने नाबाद 69, एस. मेघनाने 61 धावा झळकविल्या. शफाली वर्माने 51 धावांचे योगदान दिले. मेघना व शफाली यांनी 100 धावांची दमदार सलामी दिली. कर्णधार मिताली राज या सामन्यात केवळ 23 धावांवर बाद झाली. पुन्हा एकदा अपयशी ठरलेल्या हरमनप्रित कौरने 22 चेंडूत 13 धावा जमविल्या. हरमनप्रित फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. न्यूझीलंडतर्फे हॅना रोने तसेच रोजमेरी मेयरने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. सलामीची फलंदाज सोफी डेव्हाईन खाते उघडण्यापूर्वीच तर त्यानंतर सुझी बेट्स 5 धावांवर बाद झाल्या. न्यूझीलंडचे हे दोन फलंदाज केवळ 14 धावांत तंबूत परतले होते. ऍमेलिया केर आणि सॅटर्थवेट या जोडीने न्यूझीलंडचा डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी 103 धावांची भागीदारी केली. झुलन गोस्वामीने न्यूझीलंडच्या डावातील 24 व्या षटकात सॅटर्थवेटला 59 धावांवर बाद केले. स्नेह राणाने ऍमेलिया केरला 31 व्या षटकात 67 धावांवर बाद केले. न्यूझीलंडने 31 षटकाअखेर 4 बाद 152 धावा जमविल्या होत्या. त्यांना यावेळी विजयासाठी 19 षटकात 128 धावांची जरुरी होती.
वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया भारताच्या रेणुका सिंगने न्यूझीलंडच्या मॅडी ग्रीनला 24 धावांवर बाद केले. त्यानंतर लॉरेन डाऊन आणि केटी मार्टिन यांनी सातव्या गडय़ासाठी 76 धावांची भागीदारी केली. संघाला विजयासाठी 33 धावांची जरुरी असताना मार्टिन 35 धावांवर बाद झाली. डाऊनने आपले अर्धशतक डावातील 47 व्या षटकात झळकविले. शेवटच्या तीन षटकांमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी 23 धावांची जरुरी होती. अखेर डाऊन आणि मॅके यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. न्यूझीलंडने हा सामना 5 चेंडू बाकी ठेवून 3 गडय़ांनी जिंकला. डाऊनने नाबाद 64 तर मॅकेने नाबाद 17 धावा जमविल्या. भारतातर्फे झुलन गोस्वामीने 47 धावांत 3 गडी बाद केले. या मालिकेतील आता उर्वरित दोन सामने औपचारिक राहतील. भारतीय महिला संघ आता ही मालिका एकतर्फी न गमावण्यासाठी प्रयत्न करेल.
संक्षिप्त धावफलक
भारत- 50 षटकात सर्वबाद 279 (दीप्ती शर्मा नाबाद 69, एस. मेघना 61, शफाली वर्मा 51, रो 2 बळी, मेयर 2-43), न्यूझीलंड- 49.1 षटकात 7 बाद 280 (ऍमेलिया केर 67, डाऊन नाबाद 64, ग्रीन 24, सॅटर्थवेट 59, मार्टिन 35, मॅके नाबाद 17, गोस्वामी 3-47).