नवी दिल्ली/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यासाठी आज रवाना होणार आहेत. या दौऱ्यामध्ये मोदी संयुक्त राष्ट्रांची महासभा म्हणजेच युएनजीएच्या ७६ व्या सत्रामध्ये सहभागी होणार असून ते संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधितही करणार आहेत. तसेच ते जगभरातील नेत्यांसोबत बैठक करणार आहे. या बैठकीसाठी जगभरातील १०० देशांचे प्रमुख नेते अमेरिकेला जाणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी २५ सप्टेंबरच्या एका चर्चासत्रादरम्यान मोदी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करतील. महासभेच्या एक दिवस आधी म्हणजे २४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. ही द्विपक्षीय भेट असणार आहे.
दरम्यान, बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. व्हाइट हाऊसने राष्ट्राध्यक्षांच्या आठवडाभराच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना बायडेन हे २४ सप्टेंबर रोजीच जपानी पंतप्रधान सुगा योशीहिदे यांचीही भेट घेणार आहे. बायडेन व्हाइट हाऊसमध्ये आल्यानंतर मोदी, सुगा आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची पहिल्यांदाच प्रत्यक्षात भेट घेणार आहेत. क्वाड देशांच्या नेत्यांना पहिल्यांदाच बायडेन हे राष्ट्राध्यक्ष म्हणून भेटणार आहेत.