तीन दिवसात 256 शाळांची वाढ : 27 शिक्षक पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोना लॉकडाऊननंतर 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत. पालकांच्या संमतीने सुरु होत असलेल्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हय़ात प्राथमिक, माध्यमिक व अन्य मिळून 896 शाळा आहेत. 29 रोजी 763 शाळा सुरु झाल्या असून 16 हजार 662 विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित झाले आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधानंतर तब्बल 11 महिन्यांनी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करुन आणि आवश्यक ती खबरदारी घेऊन पालकांच्या संमतीने शाळा सुरु करण्यात येत आहेत.
प्राथमिक, माध्यमिक व अन्य अशा एकूण 896 शाळा आहेत. यापैकी 763 शाळा सुरु झाल्या आहेत. या शाळांमधून 34,083 विद्यार्थी असून यापैकी 16,662 विद्यार्थी हजर झाले आहेत. 3047 शिक्षक असून 2699 शिक्षकांची आरटीपीसीआर करण्यात आली आहे. यापैकी 27 शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय 753 शिक्षकेतर कर्मचाऱयांपैकी 745 कर्मचाऱयांची आरटीपीसीआर करण्यात आली असून यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दोडामार्गमधील सर्व शाळा सुरू!
दरम्यान दोडामार्ग तालुक्याने बाजी मारली असून तालुक्यातील 59 पैकी 59 शाळा सुरु झाल्या आहेत. तर उर्वरित तालुक्यांचा अद्यापही 100 टक्केचा आकडा पार होणे बाकी आहे.