ऑनलाईन टीम / पुणे
राज्यभरातील शाळांबाबतही निर्णय उद्या दुपार पर्यंत होणार आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यातील कॉलेज सुरू ठेवायचे की ऑनलाइन पद्धतीने चालवायचे याबाबतचा निर्णय दोन ते तीन दिवसांनी परिस्थिती पाहून घेण्यात येणार असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपुर्वी म्हटले होते. याबाबत येत्या दोन दिवसांत राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर वाढत्या ओमिक्रॉनच्या रूग्णसंख्येमुळे पुणे शहरातील पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आढावा बैठक पार पडली. यामध्ये पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय उद्या दुपारी 4 वाजता घेतला जाणार आहे.
तसेच कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इयत्ता 1 ते 9 पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग असणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाळी बंद ठेऊन ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.