निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी हरिशकुमार यांच्याकडे अर्ज सुपूर्द
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 17 एप्रिल रोजी ही निवडणूक होणार असून मंगळवार दि. 23 पासून अर्ज दाखल करुन घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी दोन अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता उर्वरित दिवशीही अर्ज दाखल होणार असून अर्जाचा आकडा वाढण्याची शक्मयता निर्माण झाली आहे.
अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस मंगळवार दि. 30 मार्च आहे. त्यानंतर 31 मार्च रोजी अर्जाची छाननी होणार असून 3 एप्रिल रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मंगळवारी वेंकटेश्वर महास्वामीजी आणि श्रीकांत पडसलगी यांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपचे उमेदवार म्हणून वेंकटेश्वर महास्वामीजी यांनी अर्ज दाखल केला आहे. तर श्रीकांत पडसलगी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या धामधुमीला सुरूवात झाली असून अर्ज माघारीनंतरच निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार आहे. आतापासून काही भागांमध्ये विविध राष्ट्रीय पक्षांचे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना देखील दिसू लागले आहेत. निवडणूक जाहीर झाली तरी राष्ट्रीय पक्षांनीही अजून आपले उमेदवार जाहीर केले नाहीत.
मस्की, बसवकल्याणमध्येही अधिसूचना जारी
बेंगळूर : बेळगाव लोकसभा मतदारसंघाबरोबरच बिदर जिल्हय़ातील बसवकल्याण आणि रायचूर जिल्हय़ातील मस्की या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील मंगळवारी अधिसूचना जारी झाली आहे. 17 एप्रिल रोजी या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार मस्की आणि बसवकल्याणमधून मंगळवारी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. मात्र, बेळगाव लोकसभा मतदारसंघातून दोघांचे अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक अधिकाऱयांकडे अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारासोबत केवळ दोघांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मस्की मतदारसंघात एकूण 2,06,354 मतदार आहेत. तर बसवकल्याणमध्ये 2,39,473 मतदार आहेत. कोरोनाबाधित, 80 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना पोस्टल मतदानाची संधी यावेळी देण्यात येणार आहे.