निवासस्थानी भेट देत वर्गमित्र गोविंद गावडेला दिल्या शुभेच्छा
वार्ताहर/ माशेल
प्रियोळ मतदारसंघात सद्यपरिस्थितीत गोविंद गावडे यांच्या नेतृत्वबद्दल कोणतीच शंका असून त्यानी आपल्या नेतृत्वगुण व प्रेमामुळेच हितचिंतक व कार्यकर्ते जोडलेले आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. काल शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास मुख्यमंत्र्यानी मंत्री गोविंद गावडे यांच्या धोणशी येथील निवासस्थानी भेट देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या वर्गमित्रासमवेत केक कापून मंत्री गावडे यांनी वाढदिवस साजरा केला.
मंत्री गावडे यांनी कोरोनाच्या सावटामुळे अंत्यत साध्या पद्धतीने वाढदिवस आपल्या धोणशी-बांदोडा येथील निवासस्थानी काल शनिवार 2 ऑक्टो रोजी साजरा केला. त्यांनी बहुतेक शुभेच्छा फोनद्वारे व सोशलमिडीयावरूनच स्वीकारल्या. तरीही निव्वळ त्याच्या प्रेमापोटी राज्यातील दिग्गज मंडळी हितचिंतक व मित्रमंडळीनी निवासस्थानी भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या. रात्री उशिरापर्यंत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रमंडळीची रेलचेल सुरू होती. यामध्ये माजी मुख्यमंत्री व फोंडयाचे विद्यमान आमदार रवी नाईक, एनआरआय कमिशनर ऍड. नरेंद्र सावईकर, आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, सभापती तथा काणकोणचे आमदार ईजिदोर फर्नाडीस, माजी आमदार प्रताप गावस, गणेश गावकर, शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर, आमदार जयेश साळगावकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई, माजी जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर, फोंडा पालीकेचे माजी उपनराध्यक्ष विश्वनाथ दळवी, उद्योजक समील वळवईकर, भोमचे सरपंच सुनिल भोमकर, दिलीप नाईक, एसटी महामंडळाचे दुर्गादास गावडे, उद्योजक बाबू रायकर, सुदेश भिंगी व इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी दै. तरूण भारत, गोवा आवृत्तीचे जाहीरात व्यवस्थापक रविंद्र पाटील यांच्यासह फोंडा कार्यालय प्रमुख सदानंद सतरकर, अजय बागकर, प्रेमानंद शिरोडकर, जनन्नाथ मुळवी व टिमने मंत्री गोविंद गावडे यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.