प्रतिनिधी /कुंकळ्ळी
फातर्पा येथे दांडिया व गरबा कार्यशाळा आयोजित केली असून या कार्यशाळेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या हस्ते झाले. विशिष्ट वाद्यांच्या तालावर ठेका धरून दांडिया, गरबा करण्यात वेगळीच मजा असते. स्थानिक महिलांना या नृत्यांचे तंत्र अवगत व्हावे यासाठी उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी ही कार्यशाळा आयोजित केली आहे.
उद्घाटनप्रसंगी श्री. कवळेकर म्हणाले की, येथील महिलांना ही नृत्यकला फारशी अवगत नाही. राजस्थान, गुजरातमधील महिला फार सुरेखरीत्या दांडिया, गरबा नृत्ये सादर करतात. केपे येथील दुर्गा पूजनोत्सवात वास्को वा इतर ठिकाणच्या महिलांचे पथक बोलवावे लागत असे. येथील महिलांना या नृत्यप्रकारांची आवड असेल तर त्यांना हे प्रकार आत्मसात करण्यास पूर्ण सहकार्य करण्यात येईल. शीतल नाईक यांनी स्वागत केले व त्यांनीच नंतर आभार मानले. वंटे, माडेमळ, मळ, बोमडामळ, फातर्पा, येथील महिला या कार्यशाळेत सहभागी झालेल्या आहेत. महिरा व मंजिरा या भगिनी कार्यशाळेत मार्गदर्शन करत आहेत.