वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फेडरेशन चषक स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे अन्यत्र खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंगळवारपासून कझाकस्तानमध्ये त्याची सुरुवात होणार होती. पण आता ती कोरोना व्हायरसच्या कारणामुळेच तीन आठवडय़ासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.
आशिया ओसेनिया गट एक मधील ही स्पर्धा प्रारंभी चीनमधील डोन्गुआन येथे 4 ते 8 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार होती. कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा आदेश कझाकस्तान सरकारने काढला आहे. त्यामुळे फेडरेशन चषक स्पर्धाही लांबणीवर टाकण्यात आली असल्याचे वृत्त मिळालेल्या असल्याचे अखिल भारतीय टेनिस संघटनेने सांगितले. ‘आयटीएफ व डब्ल्यूटीए यांच्याशी या स्पर्धेसाठी टॉपचे खेळाडू उपलब्ध होतील आणि ही स्पर्धा अन्यत्र आयोजित करण्यासंदर्भात काम करीत आहे,’ असे एआयटीएने स्पष्ट केले. या स्पर्धेत चीन, कोरिया प्रजासत्ताक, चिनी तैपेई, इंडोनेशिया, उझ्बेकिस्तान व भारत हे संघ प्लेऑफमधील दोन स्थानासाठी संघर्ष करणार आहेत.