युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता अद्यापही दिसत नसल्याने अनेक युरोपियन देशांनी स्वतःच्या संरक्षणासाठी युद्ध सज्जता वाढविण्यास प्रारंभ केला आहे. रशियाकडून वारंवार अणु युद्धाची धमकी मिळत असल्याने चिंताग्रस्त झालेल्या फ्रान्सने तीन अणुशस्त्र सज्ज पाणबुडय़ा नियुक्त केल्या आहेत.
गेल्या 30 वर्षांत प्रथमच फ्रान्सवर अण्वस्त्रयुक्त पाणबुडय़ा सज्ज ठेवण्याची वेळ आली आहे. या पाणबुडय़ा फ्रान्सच्या समुद्र तटावर देखरेख करत आहेत. या पाणबुडय़ांवर बसविण्यात आलेली अण्वस्त्रे हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा एक हजार पट अधिक संहारक आहेत असे सांगण्यात येते. रशियाकडून फ्रान्सला धोका निर्माण झाल्यास किंवा अण्वस्त्राचा उपयोग केला गेल्यास फ्रान्सही तसेच प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. फ्रान्सप्रमाणे ब्रिटनही अणु पाणबुडय़ा सज्ज ठेवण्याच्या विचारात आहे. फ्रान्सच्या पाणबुडय़ा जर्मनी आणि इटलीचे संरक्षण करण्यासही सक्षम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.