आपल्याला बटाटय़ाचे चिप्स, स्टीक्स किंवा कुरकुरीत भजी माहीत असतात. आपल्या नेहमीच्या आहारातही हे पदार्थ असतात. पण आता त्यांना अळूच्या गड्डय़ापासून बनविलेल्या याच पदार्थांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. हरकोर्ट बटलर टेक्निकल युनिव्हर्सिटी या संस्थेच्या अन्न तंत्रज्ञान विभागाने अळूच्या गड्डय़ावर विशेष अभ्यास करून अनेक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थांची निर्मिती केली आहे. या तंत्रज्ञानाला पेटंटही प्राप्त झाले आहे. या संस्थेच्या अन्न संशोधकांनी अळूच्या गड्डय़ांवर विशिष्ट प्रक्रिया करून चिप्स, भजी, स्टीक्स इत्यादी पदार्थ बनविले आहेत. अळूचा गड्डा खाजरा असतो. त्यामुळे घसा आणि जिभेला खवखव जाणवते तसेच आग होते. त्यामुळे अळूच्या गड्डय़ातील हे दोष काढून टाकण्यासाठी प्रयत्न करावे लागले. अळूच्या गड्डय़ातील कॅल्शियम ऑक्झेलेट या पदार्थामुळे ही खाज सुटते. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया करून प्रथम हे कॅल्शियम ऑक्झेलेट नाहीसे केले जाते आणि त्यानंतर हा पदार्थ खाण्यालायक बनतो.
अळूच्या गड्डय़ापासून बनविलेले पदार्थ कुरकुरीत किंवा खुसखुशीत होण्यासाठी 180 डिग्री सेल्सियस या तापमानाला तळावे लागतात. अनेक प्रयोग करून हे तापमान निश्चित करण्यात आले आहे. अळूच्या गड्डय़ात अनेक क्षार, पोषक द्रव्ये आणि जीवनसत्वे असतात. त्यांचे प्रमाण बटाटय़ापेक्षाही जास्त असते. त्यामुळे हे पदार्थ अधिक पौष्टिक असतात. ते लोकप्रिय झाल्यास शेतकऱयांनाही अळूचे गड्डे नामक उत्पन्नाचे एक नवीन साधन मिळणार आहे.