वृत्तसंस्था/ क्वेटा
पाकिस्तानच्या दडपशाहीमुळे बलुचिस्तानात आता असंतोष धगधगू लागला आहे. बलुचिस्तान प्रांताच्या ग्वादार येथील पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचा पुतळा एका बॉम्बस्फोटाद्वारे उद्ध्वस्त करण्यात आला आहे. जिन्ना यांचा हा पुतळा मरीन ड्राइव्ह या किनारी क्षेत्रात जून महिन्यात बसविण्यात आला होता.
पुतळय़ाच्या खाली स्फोटके पेरण्यात आली होती. बलूच रिपब्लिकन आर्मीचे प्रवक्ते बबगर बलूच यांनी ट्विट करत या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे. स्फोटके पेरणारे लोक पर्यटक म्हणून दाखल झाले होते. याप्रकण्री आतापर्यंत कुणाला अटक झालेली नसल्याची माहिती ग्वादारचे उपायुक्त अब्दुल कबीर खान यांनी दिली आहे.
पाकिस्तान सैन्याकडून होणारे अत्याचार आणि खजिनांच्या बेसुमार उत्खननामुळे बलुचिस्तानच्या स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. पाकिस्तानी सैन्याकडून बलुचिस्तानातील अनेक लोकांना गायब करण्यात आले आहे. याचमुळे बलुचिस्तानातील लोक आता पाकिस्तानला धडा शिकवू पाहत आहेत.