दागिने, रोकड लांबविली : एपीएमसी पोलिसात एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
बसव कॉलनी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे 4 लाखांचा ऐवज लांबविला आहे. रविवारी ही घटना घडली असून एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शहर व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या चोऱया, घरफोडय़ा थोपविण्याचे आव्हान पोलीस दलासमोर उभे ठाकले आहे. सध्या पोलीस यंत्रणा वेगवेगळय़ा बंदोबस्तात व्यग्र आहे. शहर व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या गुन्हय़ांचा तपास करण्यासही त्यांना फुरसत नाही, अशी परिस्थिती आहे. याचाच फायदा गुन्हेगार घेताना दिसत आहेत.
बसव कॉलनी येथील नवनाथ पावले यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे. रविवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून चोरटय़ांनी कडीकोयंडा तोडून 27 ग्रॅम सोने, 30 हजार रुपये रोख रक्कम व इतर किमती ऐवज चोरटय़ांनी पळविला आहे. याच परिसरातून कार आणि मोटारसायकल चोरी झाल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे.
एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. गुन्हेगार स्थानिक आहेत की बेळगावबाहेरील, याचा तपास करण्यात येत आहेत. खास करून उपनगरांतील बंद घरे चोरटय़ांनी आपले लक्ष्य बनविली आहेत. चोऱया व घरफोडय़ांचे प्रकार वाढतच असल्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी चोरटय़ांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.