वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज काझी ओनिक उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 2018 च्या नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय क्रिकेट लिग स्पर्धेवेळी ओनिकची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती.
वेगवान गोलंदाज काझी ओनिक याची उत्तेजक चाचणी घेण्यात आली त्यावेळी त्याच्या मूत्रल नमुन्यांमध्ये निर्बंध घातलेले द्रव आढळून आले आहे. ओनिकवर दोन वर्षांची बंदी घातली असल्याने आता त्याला बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये तसेच कोणत्याही स्पर्धेतील सामन्यामध्ये दोन वर्षांच्या कालावधीकरिता सहभागी होता येणार नाही. उत्तेजक चाचणीनंतर सुनावणीवेळी ओनिकने आपला गुन्हा मान्य केला. 2018 साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ओनिकने बांगलादेशतर्फे सर्वाधिक म्हणजे दहा गडी बाद केले होते.