प्रतिनिधी /कारवार
येथून जवळच्या बिणगा येथील सोमनाथ औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या आवारात मृतावस्थेतील चार वर्षीय नर बिबटय़ा आढळला. रस्त्यावरून जात असताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने बिबटय़ाचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशिक्षण केंद्राच्या आवारात मृत बिबटय़ा आढळून आल्यानंतर सदर घटनेची माहिती प्रशिक्षण केंद्राच्या कर्मचाऱयांनी वनखात्याच्या अधिकाऱयांना दिली. तातडीने घटनास्थळी दाखल होऊन वनखात्याच्या कर्मचाऱयांनी पाहणी केली. चार दिवसांपूर्वीच बिणगा येथील एका घराजवळ दाखल झालेल्या बिबटय़ाने कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीत दिसून आला होता. ठार झालेला बिबटय़ा तोच असावा, असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. येथील वनखात्याच्या अधिकाऱयांनी बिबटय़ाचा मृतदेह ताब्यात घेऊन तपासणीनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.