रस्ता बंद केल्याने हलगासह परिसरातील नागरिकांना फटका
प्रतिनिधी / बेळगाव
अलारवाड क्रॉसजवळ बी. एस. येडियुराप्पा मार्गावर बॅरिकेड्स उभे करून पोलिसांनी हा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे शहरात येणाऱया वाहनचालकांची गैरसोय होत आहे. यामुळे गांधीनगरला वळसा घालून शहरामध्ये प्रवेश करावा लागत आहे.
हलगा, अलारवाड, बस्तवाड, के. के. कोप्प यासह इतर गावांतील कामगार तसेच नोकरदार दररोज मोठय़ा संख्येने बेळगावमध्ये दाखल होत असतात. मात्र हा रस्ता अडविल्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बेळगावकडूनही बरेच जण राष्ट्रीय महामार्गाकडे दररोज ये-जा करत असतात. त्यांनाही माघारी फिरावे लागले आहे. एकूणच पोलिसांनी अचानकपणे हा रस्ता अडविल्यामुळे त्याचा साऱयांनाच फटका बसला आहे.
लॉकडाऊन सुरू असले तरी सकाळी 10 पर्यंत अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता बेळगावमध्ये खरेदीसाठी येत असते. तसेच कामानिमित्त आणि नोकरीनिमित्त अनेक जण येत असतात. तेव्हा हा रस्ता खुला करावा. विनाकारण फिरणाऱयांवर कारवाई करा. मात्र खरोखरच ज्यांचे काम आहे त्यांना ये-जा करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.