प्रतिनिधी/ मडगाव
वेळळीचे माजी आमदार बेंजामिन सिल्वा यांना शुक्रवारी काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना धारेवर धरले. बेंजामिन सिल्वा हे काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम करतात, अशा व्यक्तींना पक्षात कसा काय प्रवेश दिला जातो असा सवाल वेळळीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
वेळळीचे सरपंच सावियो डिसिल्वा हे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार होते. मात्र, पक्षाने बेंजामिन सिल्वा यांना प्रवेश दिल्याने आपली संधी गेल्यात जमा असल्याचे गृहित धरून सावियो डिसिल्वा तसेच इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा बेंजामिन सिल्वा यांना प्रवेश देण्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी नेऊन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर जोरदार टीका केली.
पक्ष संपविण्याची ही तयारी
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व गिरीश चोडणकर हे दोघे मिळून काँग्रेस पक्ष संपविण्यासाठी पुढे सरसावले असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. पक्ष मजबूत होत असतानाच, पक्ष विरोधी कारवाया करणाऱयांना पक्षात का प्रवेश दिला जातो याचे स्पष्टीकरण दय़ावे अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी बेंजामिन सिल्वा व त्यांचे समर्थक तसेच वेळळीचे स्थानिक कार्यकर्ते यांच्यात बराच वेळ गोंधळ माजला. दक्षिण गोवा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस यांनी यावेळी परिस्थिती नियंत्रण येण्यासाठी आपल्या परिने जोरदार प्रयत्न केले. त्यामुळेच परिस्तिती काही प्रमाणात नियंत्रणात आली. अन्यथा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असती.
आपण उमेदवारीसाठी दावा करणार
आपण काँग्रेस पक्षात नव्हतो. त्यामुळे उमेदवारीवर दावा करू शकत नव्हतो. मात्र, आत्ता आपण अधिकृतरित्या पक्षात प्रवेश केल्याने काँगेस पक्षाच्या उमेदवारीसाठी दावा करणार असल्याची प्रतिक्रीया बेंजामिन सिल्वा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
आपण काँग्रेससाठी कार्य केले नाही हा आरोप देखील बेंजामिन सिल्वा यांनी फेटाळून लावला. आपण, जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काम केले की नाही हे निकालावरून स्पष्ट झालेले आहे. आपण काम केले नाही असा आरोप करणाऱयांनी ते सिद्ध करावे असे आव्हान देखील त्यांनी दिले.
आमचा निर्णय आठ दिवसांनी
बेंजामिनच्या काँग्रेस प्रवेशाला विरोध करणाऱयांनी आपली पुढील काय असेल असा सवाल पत्रकारांनी केला असता ते म्हणाले की, आम्ही नक्कीच कृती करणार असून ती पुढील आठ दिवसात सर्वांना कळेल. ही कृती नेमकी अशी असेल यावर त्यांनी भाष्य केले नाही.
पक्षात शिस्त हवीच
शुक्रवारच्या घडामोडीवर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जो प्रकार घडला तो योग्य नव्हता. यापुढे पक्षात शिस्त आणण्यासाठी आपले कठोर प्रयत्न असतील व आपण कोणत्याच दपडणाखाली काम करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाची वाताहात लागली तेव्हढी खुप झाली. यापुढे असे प्रकार होणार नाही याकडे आपले अधिक लक्ष असेल.