मडगावात झाली महत्वपूर्ण बैठक : मंत्री-आमदारांची उपस्थिती
प्रतिनिधी / मडगाव
2022 मध्ये होणाऱया विधानसभेसाठी भाजपने कंबर कसण्यास सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून काल बुधवारी मडगावातील भाजपच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला दक्षिण गोव्यातील मंत्री, आमदार तसेच पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महामंत्री सतीश धोंड, प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे इत्यादीची उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, वीजमंत्री नीलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊस्कर, मच्छीमारमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स, आमदार सुभाष शिरोडकर, आमदार क्लाफास डायस, आमदार विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा, आमदार एलिना साल्ढाना, प्रदेश भाजपचे सरचिटणीस दामू नाईक व ऍड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विद्या गावडे, माजी आमदार राजेंद्र आर्लेकर तसेच दक्षिण गोव्यातील सर्व मतदारसंघातील मंडळ अध्यक्ष तसेच इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीपूर्वी पत्रकारांकडे बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, भाजपने आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दक्षिण गोव्यातील आमदार व मंत्री तसेच पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होत आहे. या बैठकीत पक्षाचे संघटन, पक्षाचे विविध कार्यक्रम तसेच पुढील सहा महिन्यात लोकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
आमदार, मंत्री जाणार जनतेकडे
कोविड-19 नियंत्रणात आणतानाच जनतेचे प्रश्न सोडविणे खूप महत्वाचे आहे. गेले वर्षभर कोविडच्या संकटामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यात असंख्य अडचणी आल्या. आत्ता कोविड नियंत्रणात आणतानाच लोकांचे प्रश्न सोडविणे महत्वाचे आहे. त्यासाठी पक्षाच्या सर्व आमदार व मंत्र्यांनी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे लागणार आहे.
पक्षातर्फे विविध कार्यक्रम
आगामी काळात भाजपतर्फे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. काही कार्यक्रम केंद्रातून आखण्यात आलेले आहेत. या सर्व कार्यक्रमाची माहिती व कार्यक्रमाची जबाबदारी कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रत्येक मतदारसंघात योग दिन
21 जून रोजी पक्षातर्फे पहिला कार्यक्रम होणार असून या दिवशी ‘योग दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. गोव्यातील सर्व मतदारसंघात हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. एका मतदारसंघात किमान दोन कार्यक्रम व्हावे असे नियोजन करण्यात आलेले आहे. हे सर्व कार्यक्रम करताना सामाजिक अंतर पाळले जाणार आहे. या कार्यक्रमात पक्षाचे सर्व आमदार व मंत्री आपआपल्या मतदारसंघातून सहभागी होणार आहेत.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिवस
23 जून रोजी भाजपचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिवस साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात युवा वर्गाला समावून घेतले जाणार आहे. हा कार्यक्रम सुद्धा सर्व मतदारसंघात होणार आहे.
25 जून रोजी ‘आणीबाणी’ निषेधार्थ काळा दिवस
25 जून रोजी स्व. इंदिरा गांधी यांनी ‘आणीबाणी’ लादली होती. हा दिवस काळा दिवस म्हणून भाजप तर्फे साजरा केला जाणार आहे. आणीबाणीच्या काळात जनसंघाच्या असंख्य कार्यकर्त्यांना तुरूंगात टाकण्यात आले होते. त्याची माहिती आजच्या युवा पिढीपर्यंत पोचली पाहिजे. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. हा कार्यक्रम आभासी (वर्चूअली) पद्धतीने होईल.
कार्यकर्त्यांसाठी 27 जून रोजी ‘मन की बात’
27 जून रोजी ‘मन की बात’ हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात प्रत्येक बुथावरील पाच-सहा कार्यकर्ते एकत्रित येऊन ‘मन की बात’ हा कार्यक्रम ऐकला पाहिजे. त्यानंतर 6 जुलै रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी केली जाणार आहे. हा कार्यक्रम भाजपच्या दक्षिण व उत्तर गोवा कार्यालयात होईल. त्यात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या संदर्भातील माहिती आभासी पद्धतीने दिली जाणार आहे. 23 जून ते 6 जुलै या दरम्यान भाजप तर्फे वनमहोत्सव कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. गोव्यातील सर्व मतदारसंघातील सर्व बुथांवर हा कार्यक्रम व्हायला पाहिजे यासाठी पक्षाचे प्रयत्न असतील असे अध्यक्ष तानावडे म्हणाले. या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक व ऍड. नरेंद्र सावईकर उपस्थितीत होते.