जागतिक स्तरावर मिळताजुळता कल : निफ्टी नव्या विक्रमासमीप
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक पातळीवरील मिळता-जुळता कल भारतीय शेअर बाजाराला तेजीची झुळूक ठेवण्यास कारणीभूत ठरला आहे. दुसरीकडे गुरुवारी राष्ट्रीय शेअर बाजाराने मात्र नव्या विक्रमाची नेंद केली आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये बीएसई सेन्सेक्स 44,953.01 पर्यंत उच्चांकी पातळीवर पोहचण्यास यशस्वी ठरला होता.
दिवसभरातील प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्सचा निर्देशांक 14.61 अंकांची तेजी प्राप्त करत 44,632.65 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक दिवसअखेर 20.15 अंकांच्या मजबुतीने 13,133.90 वर स्थिरावला आहे. सुरूवातीच्या सत्रात सेन्सेक्स निर्देशांक 300 अंकांनी वाढला होता.
दिग्गज कंपन्यांमध्ये गुरुवारी सर्वाधिक नफ्यात मारुती सुझुकीचे समभाग राहिल्याने समभाग 7 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. सोबत ओएनजीसी, एशियन पेन्ट्स, एनटीपीसी, भारतीय स्टेट बँक, बजाज फिनसर्व्ह आणि टाटा स्टील यांचे समभागही तेजीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये मात्र एचडीएफसी बँक, टीसीएस, बजाज ऑटो, इन्फोसिस आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील आशियासह अन्य बाजारांमध्ये मिळता-जुळता कल राहिल्याने भारतीय शेअर बाजाराची स्थिती चांगली राहिली आहे. गुरूवारी जागतिक शेअर बाजाराचा प्रवास संथगतीने राहिल्याचे दिसून आल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. युरोपच्या बाजारांनी सुरूवातीला घसरणीसह वाटचाल केली होती. बेंट कच्च्या तेलाचा दर 0.68 टक्के वाढीसह 47.92 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला होता.
गुरुवारी दुपारपर्यंत बाजारात काही प्रमाणात घसरण आली होती. परंतु काही सकारात्मक वातावरणामुळे शेअर बाजार सावरल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये धातू.आर्थिक कंपन्या आणि बँकांचे समभाग लाभात राहिले असून वाहन क्षेत्र काहीसे नुकसानीत राहिले आहे.