वर्षभरानंतर भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना : जागतिक कसोटी स्पर्धेतील फायनलचा मानकरी मालिकेतून ठरणार, इंग्लंडची भिस्त रुटवर
वृत्तसंस्था / चेन्नई
ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीत धुव्वा उडवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता आज शुक्रवारपासून खेळवल्या जाणाऱया इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही यशाची तीच परंपरा कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. कोव्हिड-19 मुळे क्रिकेट जवळपास ठप्प झाले असल्याने वर्षभरानंतर भारतातील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय लढत असेल. उभय संघातील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेचे बिगूल येथे वाजणार असून पहिला सामना प्रेक्षकांविना खेळवला जाणार आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाला सकाळी 9.30 वाजता प्रारंभ होईल.
इंग्लिश कर्णधार येथे आपला 100 वा कसोटी सामना खेळेल आणि इंग्लिश संघातील काही जागतिक दर्जाचे जलद गोलंदाज, अष्टपैलू खेळाडूंमुळे ही मालिका विशेष रंगतदार ठरु शकते.
विराटच्या पुनरागमनामुळे नवी ऊर्जा
विराट कोहली संघात परतला असल्याने भारतीय संघाला नवी ऊर्जा मिळेल, हे ओघानेच येईल. विराट यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यात खेळला नव्हता. पण, आता पितृत्वाची रजा संपवून तो पुन्हा ताज्या दमाने दाखल झाला आहे. अर्थात, मागील 15 वर्षांच्या कालावधीत उपखंडात कसोटी मालिका (2012) जिंकणारा इंग्लंडचा एकमेव संघ एकमेव असल्याने भारतीय संघाला दक्ष रहावे लागणार आहे.
कर्णधार जो रुट फिरकी गोलंदाजी उत्तमरित्या खेळू शकतो आणि याची उत्तम प्रचिती त्याने लंकेत दिली आहे. जेम्स अँडरसन हा जागतिक स्तरावरील सर्वाधिक बळी घेणारा जलद गोलंदाज रोहित शर्माचा संयम आणि युवा सलामीवीर शुभमन गिलच्या तंत्राची कसून परीक्षा घेईल. जोफ्रा आर्चर सातत्याने बाऊन्सर्सचा मारा करेल तर जुना चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ लागला तर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीला बहार येऊ शकते.
‘ऑस्ट्रेलियाविरुद्धचा मालिकाविजय आता इतिहासजमा झाला आहे. आम्हाला इंग्लंडविरुद्ध नव्याने सुरुवात करायची आहे’, असे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाला होता. भारताने ऑस्ट्रेलियातील उसळत्या गोलंदाजीला पोषक खेळपट्टय़ांवर उत्तम वर्चस्व गाजवले. मात्र, चेपॉकची खेळपट्टी पहिल्या दिवशी जलद गोलंदाजीला तर तिसऱया दिवसापासून फिरकी गोलंदाजीला पोषक ठरते, असा इतिहास असल्याने ही लढत वेगळय़ा धर्तीवर लढली जाईल.
फिरकीतील भिस्त फक्त मोईन अलीवर
इंग्लिश संघात मोईक अली हा एकमेव फिरकी गोलंदाज अनुभवी आहे. ऑफस्पिनर डॉम बेस व डावखुरा जॅक लीच या नवोदित फिरकी गोलंदाजांना मात्र भारतीय फलंदाजांविरुद्ध खेळण्याचा सराव नाही. जुन्या चेंडूवर ऋषभ पंतची फटकेबाजी प्रतिस्पर्ध्यांसाठी कर्दनकाळ ठरु शकते. अर्थात, भारताची गोलंदाजीची लाईनअप कशी असेल, यावर बरेच काही अवलंबून असेल. भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 2 सामने जिंकले तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. त्यामुळे देखील भारतासाठी इंग्लंडविरुद्धची ही मालिका विशेष महत्त्वाची असणार आहे.
2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केल्यानंतर जसप्रित बुमराह भारतात प्रथमच खेळेल. त्यामुळे, त्याच्यासाठी हे अनोखे पुनरागमन असेल. इशांत शर्माने वर्षभरापूर्वी बेसिन रिझर्व्हवर साधारणपणे वर्षभरापूर्वी आपला शेवटचा कसोटी सामना खेळला. मागील वर्षभराच्या कालावधीत मात्र त्याने अगदी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
दुसरीकडे, सिराजने ऑस्ट्रेलियात जी जिगरबाज गोलंदाजी केली, त्याला तोड नव्हती. त्यामुळे, इशांत की सिराज या प्रश्नाचे उत्तर देताना कोहली, शास्त्री यांच्यासमोर अवघड स्थिती असेल. इशांत यापूर्वी दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता आणि आता तंदुरुस्त आहे, हीच त्याच्यासाठी जमेची बाजू असेल. इशांतने 97 कसोटी सामने खेळले आहेत.
भारतीय संघ चेन्नईतील या पहिल्या कसोटीत 3 फिरकीपटू खेळवणे अपेक्षित असून ‘गरिबांचा रवींद्र जडेजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱया अक्षर पटेलला कसोटी पदार्पणाची अपेक्षा आहे. वॉशिंग्टन सुंदर की अक्षर पटेल, या प्रश्नाच्या उत्तरातून ते स्पष्ट होईल. रविचंद्रन अश्विन पहिल्या पसंतीचा फिरकीपटू असेल तर कुलदीप यादवमुळे आणखी एक पर्याय भारतीय संघव्यवस्थापनाकडे असणार आहे.
इंग्लिश सलामीवीर झॅक क्रॉली दुखापतीमुळे संघाबाहेर
चेन्नई ः इंग्लंडचा युवा सलामीवीर झॅक क्रॉली मनगटाला झालेल्या दुर्मीळ दुखापतीमुळे भारताविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळू शकणार नसल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. बुधवारीच 23 व्या वर्षात पदार्पण करणारा झॅक क्रॉली चेपॉक ड्रेसिंगरुमच्या मार्बलवर पाय घसरुन कोसळला आणि त्याच्या मनगटाला दुखापत झाली. वैद्यकीय चाचणीचे अहवाल आल्यानंतर क्रॉली पहिल्या दोन कसोटीत खेळू शकणार नसल्याचे ईसीबीने जाहीर केले.
उजव्या हाताने फलंदाजी करणाऱया क्रॉलीने 10 सामन्यात 616 धावा जमवल्या असून यात 1 शतक व 3 अर्धशतकांचा समावेश आहे. लंकन दौऱयात मात्र तो खराब फॉर्ममध्ये राहिला. तेथील 4 डावात त्याला 9, 8, 5 व 13 अशा किरकोळ धावांवर समाधान मानावे लागले होते.
अश्विनविरुद्ध ‘जुगलबंदी’साठी जो रुट सज्ज
चेन्नई ः फिरकीपटूंविरुद्ध खेळत असताना जो रुटचा स्वीप फटक्यांवर विशेष भर असतो. मंद, संथ खेळपट्टय़ांवर त्याची फलंदाजी अधिक बहरते. मात्र, अश्विनने त्याला सातत्याने अडचणीत आणण्यात कसर सोडलेली नाही. त्यामुळे, उभयतात या मालिकेच्या निमित्ताने जुगलबंदी रंगण्याची चिन्हे आहेत.
माजी इंग्लिश कर्णधार ग्रॅहम गूच हा आशियाई फिरकीपटूंविरुद्ध उत्तम खेळायचा. तोच वारसा आता जणू जो रुट चालवत आहे. रुटने अलीकडेच लंकेविरुद्ध 228 व 186 धावांचे दमदार डाव साकारत याची प्रचिती दिली. विराट, स्टीव्ह स्मिथ ज्या ताकदीने स्वीप फटके खेळतात, त्याचे उदाहरण माझ्यासमोर होते, असे जो रुट आभासी पत्रकार परिषदेत म्हणाला.
रुट 12-13 वर्षांचा असताना त्याला पाकिस्तानी डावखुरा मंदगती गोलंदाज नदीम खान (मोईन खानचा मोठा भाऊ) याच्याविरुद्ध फिरकी गोलंदाजी खेळला. त्या अनुभवाचा आता रुटला लाभ होत आहे. गुरुवारी त्यानेच याचा उल्लेख केला.
ऋषभ पंतला खेळवण्याचे विराटकडून स्पष्ट संकेत
चेन्नई : ऑस्ट्रेलियाची मालिका गाजवल्यानंतर ऋषभ पंतला इंग्लंडविरुद्ध मालिकेतही प्राधान्याने संधी देणार असल्याचे स्पष्ट संकेत विराटने दिले. ‘ऋषभ पहिल्या कसोटीत खेळेल. तो खेळातील सर्व आघाडय़ांवर बरीच मेहनत घेत आहे’, असे कोहली म्हणाला.
ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक ब्रिस्बेन कसोटीत नाबाद 89 धावांची झुंजार खेळी साकारली आणि त्याच बळावर भारताने 2-1 असा मालिकाविजयाचा पराक्रम गाजवला. त्यापूर्वी सिडनीतील तिसऱया कसोटीतही त्याने 97 धावांची शानदार खेळी केली होती. साहाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन कसोटीत संधी मिळाली होती. पण, या दोन्ही वेळा तो अपयशी ठरला आणि त्यानंतर संघातील त्याची जागा पंतला देण्यात आली.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, जसप्रित बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, हार्दिक पंडय़ा, मयांक अगरवाल, केएल राहुल, वृद्धिमान साहा, शार्दुल ठाकुर.
इंग्लंड : जो रुट (कर्णधार), डॉमिनिक सिबली, रोरी बर्न्स, ऑलि पोप, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), बेन फोक्स (यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, डॉमिनिक बेस, जॅक लीच, ऑली स्टोन.
सामन्याची वेळ : सकाळी 9.30 पासून.