प्रतिनिधी / कराड :
आगाशिवनगर (मलकापूर) ता. कराड येथील व्यावसायिक सहकुटूंब इस्लामपूरकडे चारचाकीतून निघाले होते. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास इस्लामपूरजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात प्रसिद्ध व्यावसायिक अधिकराव पोळ यांच्यासह त्यांच्या कारमधील गिताबाई पोळ ( वय 70), सरिता पोळ हे तिघेजण ठार झाले. या दुर्दैवी अपघाताने पोळवस्तीसह संपुर्ण आगाशिवनगर, मलकापूर शहरावर शोककळा पसरली.
अधिकराव पोळ हे कुटूंबातील काही लोकांसह इस्लामपूरकडे कारने निघाले होते. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची कार इस्लामपूरजवळ असताना कारला भीषण अपघात झाला. या अपघातात पोळ यांच्यासह कारमधील अन्य दोघे ठार झाले. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. अपघातातील जखमींना कराडच्या कृष्णा व कोल्हापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात नेमका कसा झाला याची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. पोळ यांच्या कारला झालेल्या अपघाताची माहिती मिळताच त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने रूग्णालयासह घटनास्थळी दाखल झाला. या अपघाताने त्यांच्या मित्रपरिवारावर शोककळा पसरली होती.