काश्मीरमध्ये सापडले 150 मीटर लांबीचे भुयार
श्रीनगर / वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या हद्दीतून भारतीय भूमीत घुसखोरी होण्याचा मोठा डाव उघड झाला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील कठुआ येथील हिरानगर सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांना एक 150 मीटर लांबीचा बोगदा आढळून आला आहे. या बोगद्याचा वापर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतात घुसखोरी करण्यासाठी वापरला जात होता. हा भुयारी मार्ग सापडल्यामुळे दहशतवाद्यांच्या घुसखोरीला लगाम लागणार आहे. हा भुयारी मार्ग पाकिस्तानी चौकीच्या अगदी समोरूनच खोदला गेल्यामुळे पाकिस्तानी लष्करच घुसखोरीला पाठबळ देत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरू असून, सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यातच आता भुयारी मार्गाद्वारेही घुसखोरीचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक बोगदा आढळून आला आहे. हा बोगदा जवळपास 150 मीटर लांबीचा आहे. या भागात काही सिमेंटच्या पिशव्याही सापडल्या असून त्या कराची येथील कंपनीच्या असल्याचे तपासाअंती उघडकीस आल्याने हा पाकिस्तानचाच डाव असल्याचे उघडकीस आल्याची माहिती बीएसएफच्या अधिकाऱयांनी दिली.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात बीएसएफला जम्मू काश्मीरमधील सांबा जिह्यातील बेंगालड परिसरात 25 फूट खोल व 150 मीटर लांबीचा बोगदा आढळून आला होता. विशेष म्हणजे, या भुयारी मार्गाबरोबरच शक्करगढ, कराची लिहिलेल्या काही वाळूच्या पिशव्याही तिथं सापडल्या होत्या. या बोगद्यांपासून पाकिस्तानी लष्कराची चौकी 400 मीटर अंतरावर असल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले होते. पाकिस्तानातून येणारे दहशतवादी अशा भुयारी मार्गांचा भारतात घुसखोरी करण्यासाठी वापर करतात. यापूर्वीही आंतरराष्ट्रीय सीमेवरही अशाप्रकारचे भुयारी मार्ग आढळून आले होते. 2012 मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना 400 मीटर लांबीचा बोगदा सापडला होता. हा बोगदाही सांबा सेक्टरमध्ये होता. तर दुसरा एक बोगदा पलनवाला सेक्टरमध्ये 2014 मध्ये आढळला होता.