खेडमध्ये नारंगी नदीपात्रातील घटना
प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील चिंचघर-प्रभूवाडी येथील जीवन हरिश्चंद्र कडू हा 25 वर्षीय तरुण मगरीच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास नारंगी नदीपात्रात घडली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
जीवन कडू हा तरुण नारंगी नदीपात्रातील दगडावना या ठिकाणी बैलाला पाणी पाजण्यासाठी गेला होता. यावेळी मगरीने त्याच्यासह बैलावर अचानक हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जीवन हडबडून गेला. भीतीने अक्षरशः गाळण उडाली. या झटापटीत जीवन हा जखमी झाला असून तत्काळ त्याला उपचारासाठी दापोली येथील शासकीय रुग्णालयात एका खासगी वाहनाने दाखल करण्यात आले. नदीपात्रात मगरीने अचानक तरूणावर केलेल्या हल्ल्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.