प्रतिनिधी / मडगाव
मडगाव नगरपालिकेवर यावेळी भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. मडगाव नगरपालिकेच्या निवडणुकींचा आपण सतत आढावा घेत असून यावेळी मडगाव व फातोडर्य़ात बदल होणार हे नक्की आहे. यावेळी भाजप पुरस्कृत व्हायब्रंट मडगाव पॅनल बाजी मारणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावला भेट देऊन एकूण सहा ठिकाणी कोपरा बैठका घेतल्या. या बैठकांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मडगाव व फातोडर्य़ातील जनतेला आजवर येथील आमदारांनी भूल थापा मारून फसवणूक केली आहे. मात्र, यावेळी येथील सुशिक्षित जनता या भूलथापाना बळी न पडता बदल घडवून आणताना व्हायब्रंट पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील असे मुख्यमंत्री म्हणाले.
सलग दोन वेळा मडगाव व फातोडर्य़ातील जनतेने आमदार दिगंबर कामत व विजय सरदेसाई यांच्या पॅनलला संधी दिली. परंतु, त्यांना पालिका क्षेत्राचा विकास साध्य करता आलेला नाही. त्यामुळेच जनता यावेळी बदलासाठी सज्ज झाल्याचे मुख्यमंत्री कोपरा बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले.
मडगाव पालिका क्षेत्राचा विकास करतानाच येथील नागरिकांचा देखील आपल्याला विकास साध्य करायचा आहे. त्यासाठी मतदार व्हायब्रंट मडगावच्या पॅनलला संधी देतील असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने आत्ता पर्यंत 3 हजार सरकारी नोकऱयांसाठी जाहिरात दिलेली आहे. अजून सात हजार नोकऱयांची जाहिरात येणे बाकी आहे. मडगाव व फातोडर्य़ातील युवा-युवतीनी त्यासाठी अर्ज करावे असे मुख्यमंत्री म्हणाले.
डॉ. रोनिता आजगांवकरला संधी द्या
व्हायब्रंट बॅनलच्या उमेदवार डॉ. रोनिता राजेंद्र आजगांवकर यांना मतदारांनी निवडून द्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगांवकर यांनी केली. सिने लताजवळ आयोजित केलेल्या कोपरा बैठकीत ते बोलत होते.
सिने लताजवळ प्रभागातून या पूर्वी मतदारांनी आपल्याला नगरसेवक म्हणून निवडून दिले होते. त्यानंतर राजेंद्र आजगांवकर यांना ही संधी दिली होती. त्याच प्रमाणे आत्ता डॉ. रोनिता आजगांवकर यांना मतदारांनी मोठय़ा मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन बाबू आजगांवकर यांनी केले.