नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑलिम्पिक पदकविजेता मल्ल सुशील कुमार याला दिल्लीतील न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी रात्री त्याला पंजाबमध्ये अटक करण्यात आली होती. अटकेनंतर रविवारी त्याचा ताबा दिल्लीतील विशेष तपास दलाने घेत न्यायालयासमोर हजर केले. सुशीलकुमार याच्यासोबतच त्याचा सहकारी अजय कुमार यालाही ताब्यात घेण्यात आले असून दोघांनाही पुढील तपासासाठी दिल्ली पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये घडलेल्या मल्ल सागर राणा हत्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेतील दोघांचाही सागरच्या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. दिल्लीतील मॉडेल टाऊनमधील एक फ्लॅट रिकामा करून घेण्यावरून झालेल्या वादादरम्यान ही हत्येची घटना घडली होती. दिल्ली पोसिलांनी सुशील कुमारची माहिती देणाऱयाला 1 लाख रुपये तर अजय कुमारची माहिती देणाऱयालाही 50 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते. तो बरेच दिवस फरार होता. आता मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून तो पंजाबमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचत शनिवारी रात्री अटकेची कारवाई केली होती.