राजपत्रात नोंद झाल्यानंतर महापौर-उपमहापौर निवडणुकीची घोषणा
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले असून, नवनिर्वाचित नगरसेवकांची नोंद राज्याच्या राजपत्रात झाल्यानंतर महापौर-उपमहापौर निवडणूक घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या 58 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोरोना नियमावलीचे पालन करत सोमवारी मतमोजणी झाली. या मतमोजणीनंतर महापालिकेत भाजपचे 35 नगरसेवक निवडून आले आहेत. तर काँग्रेसला 10 जागा व एमआयएमला 1 जागा मिळाली असून, उर्वरित 12 जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. सदर निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली.
महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी यापूर्वीच आरक्षण जाहीर झाले आहे. महापौरपद सामान्य आणि उपमहापौरपद सामान्य महिला यासाठी खुले आहे. पण नगरसेवकांची नोंद राजपत्रात झाल्यानंतर महापौर-उपमहापौर निवडणूक होईल, असे जिल्हाधिकाऱयांनी अधिकृतरित्या जाहीर केले आहे.