भारत तिसरा सर्वाधिक पीडित देश : प्रेस अन्बलम कँपेनचा अहवाल : दक्षिण अमेरिका खंडात सर्वाधिक जीवितहानी
कोरोना महामारीमुळे मोठय़ा संख्येत लोक मृत्युमुखी पडले आहेत. पत्रकारही या संकटापासून अस्पृश्य राहिलेले नाहीत. मागील वर्षी मार्चनंतर 59 देशांमध्ये 600 हून अधिक पत्रकारांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. प्रेस इन्बलम कँपेन ही स्वीत्झर्लंड येथील एक आंतरराष्ट्रीय मीडिया वॉचडॉग आहे. या संस्थेनुसार 1 मार्च 2020 पासून कोविड-19 मुळे जीव गमाविणाऱया 602 पत्रकारांपैकी निम्म्याहून अधिक मृत्यू दक्षिण अमेरिकेत (303) झाले आहेत. तर आशियाचा खंडात 145 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. युरोपमध्ये 94, उत्तर अमेरिकेत 32 आणि आफ्रिकेत 28 पत्रकार महामारीमुळे दगावले आहेत.
फोरमने मृत पत्रकारांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या मागणीनुसार प्राथमिकतेच्या आधारावर लसीकरण केले जावे, असे फोरमने म्हटले आहे. कार्यस्वरुपामुळे पत्रकारांना थेट लोकांच्या संपर्कात राहू काम करावे लागते. विशेषकरून मुक्त पत्रकार तसेच छायाचित्रकार स्वतःच्या घरातून काम करू शकत नाहीत, अशा स्थितीत यातील अनेकांना महामारीचा धोका असल्याचे पीईसीचे महासचिव ब्लाइस लेम्पेन यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानात 22 पत्रकार दगावले
पेरूमध्ये सर्वाधिक प्रसारमाध्यम प्रतिनिधी दगावले आहेत. तेथे कोरोनामुळे 93 प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलमध्ये 55 आणि भारतात 53 पत्रकारांचा मृत्यू ओढवला आहे. मेक्सिकोत 45 इक्वेडोरमध्ये 42, बांगलादेशात 41, इटलीत 37 आणि अमेरिकेत 31 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. तर पाकिस्तानात 22 पत्रकारांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तुर्कस्तानात 17, ब्रिटनमध्ये 13, पनामा येथे 11 आणि बोलिवियामध्ये 9 प्रसारमाध्यम कर्मचाऱयांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ, कॅमेरून, इजिप्त, ग्वाटेमाला, इराण, साल्वाडोर, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाम्बेमध्ये प्रत्येकी 3 तर अल्जीरिया, इंडोनेशिया, मोरक्को, पॅराग्वे, पोर्तुगाल आणि स्वीडनमध्ये प्रत्येकी 2 जण दगावले आहेत.
अन्य देशांमध्येही हानी
अफगाणिस्तान, डॉमिनिक प्रजासत्ताक, नायजेरिया आणि रशियात प्रत्येकी 8 तर अर्जेंटीना, कोलंबिया आणि होंडुरासमध्ये प्रत्येकी 7 पत्रकार दगावले आहेत. निकारागुआ, स्पेन आणि व्हेनेझुएलात प्रत्येकी 6 तर फ्रान्समध्ये 5 प्रसारमाध्यम कर्मचाऱयांचा महामारीमुळे मृत्यू झाला आहे. कॅनडा, जर्मनी, जपान, इस्रायल, स्वीत्झर्लंड, बेल्जियम, उरुग्वे, ऑस्ट्रिया, अजरबैजान, बुल्गारिया, चिली, कांगो प्रजासत्ताक, इराक, कजाकिस्तान, केनिया, किर्गिस्तान, लेबनॉन, सौदी अरेबिया, युगांडा, ताजिकिस्तान आणि टोगो येथेही किमान एका पत्रकाराला जीव गमवावा लागला आहे.
सरकारकडून मदत
कोविड-19 ला बळी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अलिकडेच घेतला आहे. पत्रकार कल्याण योजनेच्या अंतर्गत आर्थिक मदत प्राप्त करण्यासाठी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाल्याची माहिती पीईसीचे भारतातील योगदानकर्ते नवीन ठाकुरिया यांनी दिली आहे.