प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव पालिकेने वास्को शहरातील भाजी मार्केटमधील व्यापाऱयांविरूध्द कारवाई हाती घेतली आहे. काही अतिक्रमणे हटवताना पुन्हा अतिक्रमणांचे प्रयत्न केल्यास व्यावसाय परवानाच रद्द करण्याचा इशारा पालिकेने व्यापाऱयांना दिला आहे. सध्या या मार्केटमध्ये व्यापाऱयांनी गोंधळ माजवलेला असल्याने ही कारवाई हाती घेण्यात आली.
शहरातील नवीन भाजी मार्केटमधील अतिक्रमणांविरूध्द पालिकेकडून वारंवार कारवाई केली जाते. मात्र, व्यापाऱयांना पुन्हा पुन्हा रस्त्यावर बस्तान मांडण्याची सवय जडलेली आहे. या प्रकाराविरूध्द काल शुक्रवारी मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत, उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर, इतर नगरसेवक, पालिका मुख्याधिकारी अरविंद बुगडे व इतर अधिकारी व कर्मचाऱयांनी या मार्केटमध्ये फिरून पाहणी केली. या कारवाईत काही अतिक्रमणे हटवण्यास भाग पाडण्यात आले. काही व्यापाऱयांनी रस्ता व गटारावरही अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे काही ठिकाणी पावसाळी पाणी तुंबून राहात आहे. त्यामुळे गलिच्छताही निर्माण होत आहे.
पालिका नगराध्यक्ष व त्यांच्या पथकाने व्यापाऱयांना कडक शब्दात तंबी दिली आहे. अतिक्रमणाचा प्रयत्न पुन्हा केल्यास व्यवसायीक परवानेच रद्द करू असा ईशाराही देण्यात आला आहे. पालिकेचे कर्मचारी आता रोज पाहणी करणार असून गैरप्रकार आढळून आल्यास मुख्याधिकारी कारवाई हाती घेतील. डय़ूटीवरील अधिकारी व कर्मचाऱयांनी मार्केटमधील गैरप्रकारांकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावरही मुख्याधिकाऱयांकडून कारवाई होईल.