15 ते 18 वयोगटातील मुलांना देण्यात येणार लस
प्रतिनिधी /बेळगाव
जिह्यात 298 लसीकरण केंद्रांची स्थापना करुन 2 लाख 47 हजार मुलांना लस देण्यात येत आहे. या संबंधी पालक व मुलांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांना सक्तीने लस द्यावी, असे आवाहन पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केले.
सोमवारी शिवबसवनगर येथील एस. जी. बाळेकुंद्री अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला पालकमंत्र्यांच्या हस्ते चालना देण्यात आली. जिह्यातील 2 लाख 47 हजार मुलांना लस देण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. उद्घाटनानंतर मुलांच्या लसीकरणाला चालना देण्यात आली.
संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. 10 जानेवारीपासून बुस्टर डोसही देण्यात येणार आहेत. यासंबंधी जास्तीत जास्त जनजागृती करण्याची गरज आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रत्येकांनी मार्गसुचींचे पालन करावे. देशात 240 कोटी लसींचे उत्पादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. याबरोबरच ऑक्सीजनचे उत्पादन, प्रयोग शाळांची स्थापना करुन वैद्यकीय व्यवस्था अधिक बळकट करण्यात आल्याचेही गोविंद कारजोळ यांनी सांगितले.
पहिल्या व दुसरा डोस देतानाही बेळगावने प्रगती केली आहे. संभाव्य तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी खासदार मंगला अंगडी, विधान परिषद सदस्य साबन्ना तळवार, डॉ. आय. पी. गडाद, आमदार अनिल बेनके, प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, मनपा आयुक्त डॉ. रुदेश घाळी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. बी. मुन्याळ, जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नालतवाड आदी उपस्थित होते.