उंब्रजजवळ वॅगनर कारला भीषण अपघात
प्रतिनिधी/ उंब्रज
कोल्हापूर जिल्हय़ातील चंदगडमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मुलांना आणण्यासाठी निघालेल्या पुण्याच्या डॉक्टर दाम्पत्याचा कराड तालुक्यातील उंब्रजजवळ भीषण अपघातात कार अपघातात जागीच मृत्यू झाला. शनिवारी पहाटे 3.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
अमित आप्पाजी गावडे (वय 38) व डॉ. अनुजा अमित गावडे, (वय 35, रा. ग्रीनफिल्ड सोसायटी हडपसर, पुणे) असे अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. हे दाम्पत्य पुण्याहून कोल्हापूरकडे मुलांना आणण्यासाठी जात असताना काळाने घाला घातला. महिला चालकाचे कारवरील नियत्रंण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या दुभाजकाला धडकून रस्त्याच्या विरुद्ध लेनवर पलटी झाली. अपघातानंतर रस्त्यावर तसेच कारमध्ये रक्ताचा सडा पडला होता. कारचे दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
पुणे येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. अनुजा गावडे त्यांचे पती आमित गावडे हे शनिवारी रात्री वॅगनर कारने पुण्यावरून कोल्हापूरकडे निघाले होते. त्यावेळी डॉ. अनुजा गावडे या कार चालवत होत्या. पहाटे 3.45 वाजण्याच्या सुमारास आशियाई महामार्गावर भोसलेवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत आल्यानंतर नियत्रंण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या दुभाजकाला धडकून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला कराड ते सातारा जाणाऱया लेनवर आदळली. यामध्ये दोघांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीस तसेच हायवे हेल्पलाइन कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, सलिम देसाई, रमेश खुणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दोघांचाही मृत्यू होऊन कार रक्ताने माखली होती. कटावणीच्या साह्याने कारचे दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघाताने पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.
आई-वडील आणि मुलाची कायमची ताटातूट
लॉकडाऊनमुळे संचारबंदी घोषित झाली. भोसलेवाडी येथे अपघातात ठार झालेल्या पुणे येथील दाम्पत्याची मुले कोल्हापूर जिह्यातील चंदगड येथे नातेवाईकाकडे अडकून पडली होती. परंतु बऱयाच दिवसापासून त्यांना पुण्यातून बाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे शुक्रवारी रात्री बाहेर पडण्याची परवानगी मिळाल्यानंतर सदर दाम्पत्य त्यांच्या कारने मुलांना आणण्यासाठी चंदगडला निघाले होते. परंतु काळाने घाला घातला. अन् आई वडील आणि मुलाची कायमची ताटातूट झाली.