प्रतिनिधी /फोंडा :
म्हार्दोळ येथील पंचायत सभागृहात कोरोना रुग्णांसाठी निगा केंद्र सुरु करण्यास वेलिंग प्रियोळ पंचायतीच्या पाच पंचसदस्यांनी विरोध केला आहे. ज्या ठिकाणी म्हार्दोळचा बाजार भरतो तेथे निगा केंद्र उभारल्यास इतर लोकांना संसर्ग होण्याचा धोका आहे, असे पंचसदस्य तथा माजी सरपंच लक्ष्मीकांत खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
यावेळी मंगेश गावडे, रोहिणी नाईक, हर्षा गावडे व संजना गावडे हे पंचसदस्य व अन्य काही ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोना निगा केंद्राला आमचा विरोध नाही मात्र म्हार्दोळ सारख्या बाजारपेठ व गजबजलेली लोकवस्ती असलेल्या ठिकाणी ते सुरु करण्यास विरोध असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. प्रियोळ पंचायत क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने सरपंचांनी जी तातडीची बैठक बोलावली त्या बैठकीला आम्ही उपस्थित होतो. यावेळी पंचायत सभागृहात कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यासंबंधी चर्चा झाली होती. मात्र तसा निर्णय झाला नव्हता, असेही खेडेकर यांनी स्पष्ट केले. म्हार्दोळपासून जवळच फर्मागुडीला कोरोना निगा केंद्र असताना म्हार्दोळ भागात अजून एका निगा केंद्राची गरजच काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. समीर नाईक या ग्रामस्थाने म्हार्दोळ बाजारपेठेजवळ अशा प्रकारचे निगा केंद्र उभारल्यास व्यापाऱयांबरोबरच ग्राहकांना त्यापासून धोका निर्माण होणार असल्याचे सांगितले.