देशात आणण्यासाठी प्रयत्न सुरू : संपर्कासाठी दोन अधिकाऱयांची नेमणूक
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या जिल्हय़ातील 17 विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी दोन नोडल अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते अधिकारी मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. लवकरच त्यांना सुरक्षित मायदेशी आणले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे.
शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले जिल्हय़ातील 19 विद्यार्थी सध्या अडकले होते. त्यामधील बैलहोंगलमधील दोन विद्यार्थी बुधवारी देशात दाखल झाले आहेत. अजून 17 विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. त्यांना आणण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू असल्यामुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत. याचबरोबर त्यांचे कुटुंबीयसुद्धा तणावाखाली असल्याचे त्यांनी सांगितले.
जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांच्या कुटुंबीयांची गाठभेट घेण्याची सूचना सर्व तहसीलदारांना करण्यात आली आहे. ज्या तालुक्यातील विद्यार्थी आहेत त्या तालुक्मयातील तहसीलदारांनी त्यांची भेट घ्यायची आहे. त्यांच्या कुटुंबीयांना धीर द्यायचा आहे, अशी सूचना करण्यात आली आहे. याचबरोबर आपण स्वतः देखील दोन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन चौकशी करणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.
युक्रेन येथील विद्यार्थ्यांच्या संपर्कासाठी स्मार्ट सिटीचे एमडी प्रवीण बागेवाडी आणि प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. ते सध्या मुंबईमध्ये असून विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये आहेत. निश्चितच लवकरात लवकर त्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहितीदेखील जिल्हाधिकाऱयांनी यावेळी दिली.