मंडणगडातील प्रकार
प्रतिनिधी / मंडणगड
गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमणापासून दूर असलेल्या मंडणगड तालुक्यात कोरोना प्रतिबंध लसिकरणाच्या मोहिमेत सहभागी झालेले तालुका वैद्यकीय अधिकारी दुसऱया लसीकरणानंतर शनिवारी कोरोनाबाधीत झाल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकाराने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कातील सुमारे 20 कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, तालुक्यातील एक अंगणवाडी सेविकादेखील कोरोनाबाधीत झाल्याची माहिती पुढे आली आहे. तालुक्यात सध्या एकूण 5 कोरोना बाधीत आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसल्याने त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. शनिवारच्या अहवालानुसार या अंगणवाडी सेविकेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. मात्र सोमवारी संध्याकाळपर्यंत तालुका प्रशासनाने यासंदर्भात कोणतीही ठोस पावले उचललेली दिसून आलेली नाहीत. सोमवार अखेर तालुक्यातील आरोग्य विभागाच्या 319 कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधाची पहिली लस देण्यात आली. यापैकी 197 कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधाची दुसरी लस देण्यात आली आहे.
240 शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिंबधक लसीकरण मोहिमेतील पहिले लसीकरण करण्यात आले. यातील 86 जणांना दुसरे लसीकरणही करण्यात आले आहे. तालुक्यातील 34 ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. याशिवाय आरोग्याच्या तक्रारी असणाऱ्या 6 नागरिकांचे पहिले लसीकरण करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरु झाल्यापासून तालुक्यातील 599 नागरिकांना पहिले लसीकरण, तर 283 जणांना दुसरे लसीकरणही करण्यात आले आहे.