प्रतिनिधी / संगमेश्वर
चिपळूण तालुक्यातील नायशी गावातील रहिवाशी राजाराम आत्माराम घाग हे सकाळी गावातून कोंडीवरे येथे चालत येत असताना पुलाशेजारी तोल जाऊन नदी पात्रात पडले . मात्र एका तरुणाने धाडस दाखवत नदी पात्रात उडी घेऊन घाग यांचे प्राण वाचवले आहेत.
प्रवाहासोबत वाहत जात असताना राजाराम घाग यांना नदी पात्रात झाड सापडले . त्या झाडाला पकडून जिवाच्या आकांताने ते ओरडू लागले. स्थानिकांना कळताच राजाराम घाग यांना वाचवण्यासाठी लोकांची धडपड सुरू झाली.नदी पात्र खोल असल्याने घाग यांना बाहेर काढण्यासाठी उत्तम पोहणाऱ्या माणसाची गरज होती. स्थानिकांनी लगेच माखजन कुंभारवाडी येथील अमित गोपाळ कुंभार याना बोलावून घेतले. पोहण्यात तरबेज असलेल्या अमित कुंभार यांनी धाडसी प्रयत्न करून नदी पात्रात झेप घेतली. अमित याने स्थानिकांच्या मदतीने राजाराम घाग यांना नदीपात्रातून बाहेर काढले. अमित कुंभार हे राजाराम घाग यांच्यासाठी देवदूतच ठरले आहेत. भर पावसात, पाण्याने ओसंडून भरलेल्या नदीपात्रात उडी मारून अमित कुंभार यांनी राजाराम घाग यांचे प्राण वाचवल्याने,अमित यांचे कौतुक केले जात आहे