घंटागाडीकडे कचरा जमा करण्याचे हिंडलगा ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांचे आवाहन
वार्ताहर /हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात रस्त्याकडेला कोठेही कचरा टाकताना आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय ग्राम पंचायतीने घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी याची दखल घेऊन घरगुती कचरा घंटागाडीकडे देऊन सहकार्य करण्याचे आवाहन ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी केले आहे.
हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात दिवसेंदिवस लोकवस्ती मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. शहरापासून गाव अत्यंत जवळ असल्याने बेळगाव आणि परिसरातील नागरिकांनी हिंडलगा भागात वास्तव्य करण्यास अधिक पसंती दर्शविली आहे. पंचायतीने देखील रहिवाशांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पण नागरिकांनी मात्र घरगुती कचरा रस्त्याकडेला टाकून अस्वच्छता निर्माण केली आहे. कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी पंचायतीने घंटागाडीची सोय केली आहे. तरीदेखील नागरिक कचरा घंटागाडीकडे न देता रस्त्याकडेला फेकत आहेत. यामुळे ठिकठिकाणी कचराकुंडय़ा निर्माण झाल्या आहेत. याचा नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मध्यंतरी तत्कालिन माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर यांनी गावच्या स्वच्छतेवर अधिक भर देत कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी वाहनांची सोय करून दिली आहे तर सध्यादेखील कचऱयाची उचल करण्यासाठी पंचायतीकडे पूर्ण क्षमता आहे. असे असतानाही रहिवाशांनी मात्र पंचायतीच्या आवाहनाकडे साफ दुर्लक्ष करत रस्त्याकडेला कचरा टाकून परिसर अस्वच्छ बनविणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी यापुढे गावातील कोणीही व्यक्ती किंवा व्यावसायिक रस्त्याकडेला कचरा टाकताना सापडल्यास 1500 रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पंचायतीने घेतला आहे. याशिवाय बाहेरगावच्या नागरिकांनीदेखील या ठिकाणी कचरा आणून टाकल्यास त्यांना 3000 रुपये दंड आकारण्यात येणार असून कचरा टाकणाऱयास पकडून देणाऱयाला बक्षीस देण्यात येणार आहे. याची सर्वांनी दखल घ्यावी, असे आवाहन ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी केले आहे.