सर्व चर्चमध्ये विद्युत रोषणाई : येशू ख्रिस्त जन्म देखावे
प्रतिनिधी /पणजी
नाताळचा धुमधडाका गोवा राज्यात सुरु झाला असून तो आता नवीन वर्ष 2023 उजाडेपर्यंत चालणार आहे. गोव्यातील सर्व प्रमुख चर्चमध्ये नाताळ सणाचा उत्साह मध्यरात्रीपासून सुरु झाला आणि प्रार्थना, एकमेकांना शुभेच्छा देत सर्वांनी तो साजरा केला. नाताळनिमित्ताने चर्चमध्ये रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आली असून अनेक ठिकाणी गोठय़ातील येशू ख्रिस्ताचा जन्मदेखावा साकारण्यात आला आहे.
गोव्याबाहेर असलेले गोमंतकीय मोठय़ा संख्येने नाताळसाठी गोव्यातील आपल्या घरी परिवारात सामील झाले असून पुढील आठवडाभर हा नाताळचा उत्साह कायम राहणार आहे. नाताळला जोडून नवीन वर्षाची सुरुवात होणार असल्याने देशी-विदेशी पर्यटक मोठय़ा संख्येने गोव्यात पोहोचले असून त्यांनी नाताळच्या विविध कार्यक्रमात सहभाग दर्शवला आहे. मध्यरात्रीपासूनच चर्चमध्ये घंटानाद तसेच प्रार्थनांचे सत्र सुरु झाले असून ते काल रविवारी दिवसभर चालू राहिले.
शाळा – कॉलेजना नाताळची सुट्टी चालू झाल्याने अनेक कुटुंबे खरेदीसाठी गर्दी करीत असून बाजारपेठा नाताळसाठी सजल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक – महाराष्ट्रातून अनेक कुटुंबे पर्यटनासाठी गोव्यात आली आहेत तर गोव्यातील अनेक कुटुंबे पर्यटनासाठी गोव्याबाहेर गेली आहेत.