पर्यटक बनून भाडय़ाने घेतलेल्या खोल्यांतून चालतो सट्टा
प्रतिनिधी/ पणजी
आयपीएल क्रिकेट सामने सुरु झाल्यापासून विविध राज्यांमधून गोव्यात दाखल होऊन परप्रांतीयांकडून मोठय़ा प्रमाणात सट्टेबाजी सुरु असून पोलीसही बेधडकपणे कारवाई करीत आहेत. आत्तापर्यंत सात प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यातील चार प्रकरणे कांदोळी परिसरातील तर तीन प्रकरणे इतर ठिकाणची असून आतापर्यंत 27 जणांना अटक करण्यात आली आहे. रविवार 25 ऑक्टोबर रोजी रात्री हडफडे येथील ताज्या छाप्यात पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांनी 1 कोटी 17 लाख रुपयांचा सट्टा व्यवहार केल्याचे उघड झाले आहे.
रविवारी रात्री गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलिसांनी हडफडे येथे केलेल्या या धडक कारवाईत तिघा सट्टेबाजांना अटक केली असून त्यांच्या विरोधात जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. शक्ती पंजाबी, विशाल आहुजा, हितेश केसवानी अशी संशयितांची नावे तिघेही गुजरात राज्यातील आहेत. आयपीएल सुरु झाल्यापासून संशयितांनी सुमारे 1 कोटी 17 लाख रुपयांचा सट्टा घेतला होता. संशयितांकडून जप्त केलेल्या लॅपटॉपवर सट्ट्sबाजीचा हिशोब पोलिसांना मिळाला आहे.
कळंगुट, कांदोळी, ताळगावमधील सात कारवायांमध्ये 27 जण गजाआड
आतापर्यंतच्या सात कारवायांमध्ये पोलिसांनी 27 परप्रांतीय सट्टेबाजांना अटक केली आहे. लाखो रुपयांच्या रोख रक्कमेसह मोठय़ा प्रमाणात मोबाईल फोन, लॅपटॉप व इतर साहित्य जप्त केले आहे. संशयितांच्या विरोधात जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सीआयडीने तीन ठिकाणी कारवाई करून 10 संशयिताना अटक केली तर कळंगुट पोलिसांनी चार ठिकाणी कारवाई करून 17 संशयितांना अटक केली आहे.
कांदोळी छाप्यात हैद्राबादी चारजणांना अटक
कळंगुट पोलिसांनी मंगळवार 13 ऑक्टोबर रोजी कांदोळी येथे केलेल्या कारवाईत आधुरी नागा राजू, इरिकी व्यंकट गणेश, पिटानी किशोर कुमार, रुद्रा सुर्यनारायण राजू या हैद्राबाद येथील संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मोबाईल लॅपटॉप जप्त केले होते.
ताळगावातील छाप्यात छत्तीसगडचे सट्टेबाज
सीआयडीने रविवार 11 ऑक्टोबर रोजी रात्री ताळगाव येथे केलेल्या कारवाईत सट्टेबाजी रॅकेट गजाआड केले होते. या प्रकरणात चारजणांना अटक करुन त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप व इतर समान मिळून दोन लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला होता. अटक केलेल्यांमध्ये रणजीत छाब्रा, सुनील मोटावनी, कपिल तोलानी व विनय गंगवानी (चोघेही छत्तीगड येथील) होते. ताळगाव येथील चामुंडा रेसिडेन्सीतील एका फ्लॅटमध्ये ही सट्टेबाजी सुरु होती.
कळंगुटमधील छाप्यात मध्यप्रदेशचे 5 जण
कळंगुट पोलिसांनी शनिवार 10 ऑक्टोबर रोजी रात्री केलेल्या कारवाईत पाच परप्रांतीय सट्टेबाजांना पंचवीस हजार रुपये तसेच 15 महागडे मोबाईल संच, तीन लॅपटॉपसह अटक केली होती. ही कारवाई मध्यरात्री बागा-कळंगुट येथील तवा-पॅलेस या नामांकित हॉटेलच्या रुमवर करण्यात आली होती. मनोज थडानी (39, इंदोर), बंटी डांगी (32, इंदोर), चिंटु धोयध्याय (21, इंदोर), रुपेश सिंग (32, मुंबई), जगदीश नेपाळी (47, नेपाळ) यांना कळंगुट पोलिस पथकाकडून रंगेहात अटक केली होती. सिएसके चेन्नई व रॉयल चॅलेंजर्स (बंगळुरु) यांच्यात खेळल्या जाणाऱया टीमवरुन ही सट्टेबाजी चालली होती.
शनिवारी 3 ऑक्टोबर रोजी कळंगुट पोलिसांनी कांदोळी येथे कारवाई करून 3 संशय़ितांना अटक केली होती. त्यात भानू पी, राजू राव, शाही किरण (सर्वजण हैद्राबाद येथील आहेत) यांचा समावेश होता.
गुरुवार 1 ऑक्टोबर रोजी सीआयडी पोलिसांनी मोरजी येथे कारवाई करून आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून एक लॅपटॉप 8 मोबाईल फोन, एलइडी टीव्ही तसेच रोख रक्कम 19200 जप्त केली होती. संशयितांच्या विरोधात बेकायदेशीर जुगार प्रतिबंधक कायदा 1976 नुसार गुन्हा नोंद केला होता. अटक केलेल्या संशयितांमध्ये संदीप पटेल, कृष्णकांत व भोजा भोपाल यादव तिघेही हैद्राबाद येथील आहेत.
त्याच रात्री म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी कळंगुट पोलिसांनी कांदोळी येथे कारवाई करून 5 संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच लॅपटॉप मोबाईल व इतर दस्तावेज जप्त केला होता. अटक केलेल्यांमध्ये मोहित कुमार, राजू सिंग, रवी ममतानी, सुरज सोनी व सागर सिंग राठोड यांचा समावेश होता.